चौकीला शासनमान्यता नसल्याने पहारा नाही

अनधिकृत बांधकामांमुळे बदनाम असलेल्या दिवा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. लाखो लोकसंख्या असलेल्या या शहरासाठी अद्याप एकही पोलीस ठाणे नाही. काही महिन्यांपूर्वी येथे पोलीस चौकी उभारण्यात आली. मात्र त्या चौकीत अद्याप पोलीस पहारा सुरू झाला नसल्याने ती कुचकामी ठरली आहे. गेले काही दिवस दिवा परिसरातील आगासन, दातिवली आदी गावांमध्ये चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी दिवावासीयांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. पोलीस चौकी उभारण्यात आली असली तरी अद्याप त्याला शासन मान्यता मिळाली नसल्याचे त्यांना स्पष्ट केले.

दिव्यात पोलीस ठाणे नाही. त्यात मुंब्य्रातील पोलीस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे पोलिसांच्या गस्तींना मर्यादा पडतात. त्यामुळे आता अशा बैठका घेऊन पोलीस नागरिकांवरच अप्रत्यक्षरीत्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोपवत आहेत. नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून त्याऐवजी शासनाने पोलीस बल वाढवावे, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.

फक्त २० पोलिसांचा बंदोबस्त

साडेचार लाख लोकसंख्या असणाऱ्या दिवा शहरासाठी फक्त २० पोलिसांची नेमणूक केली आहे. त्यातही एका शिफ्टमध्ये जेमतेम नऊ ते दहा पोलीसच उपलब्ध असतात. दिवा परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे स्वंतत्र पोलीस ठाणे सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या गृहविभागाने घेतला होता. मात्र त्यानंतर येथे छोटी पोलीस चौकी सुरू करण्यात आली. मात्र त्या पोलीस चौकीलाही शासनाची मंजुरी नसल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. पूर्णवेळ साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच महिला पोलीस अधिकारी येथे उपलब्ध नसतात. महिला पोलिसांची संख्या अवघी चार आहे. पोलिसांना गस्तीसाठी पुरेशी वाहनेही नाहीत.

दिवा शहरात कायदा सुव्यवस्था राखली जावी म्हणून दिवा पोलीस चौकी बांधण्यात आली आहे. मात्र या पोलीस चौकीला शासनाची मंजुरी नाही. मात्र निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गस्त वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.

– अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त