‘टायटॅनिक’ चित्रपट पाहिल्यावर वास्तवात त्या प्रसंगी जीव गमावलेल्या निष्पाप लोकांची आठवण झाल्यावर संवेदनशील मन व्याकुळ होते. मात्र इतक्या मोठय़ा संकटात काही जीव वाचल्यावर त्या लोकांचे नशीबच बलवत्तर असे आपसूकच मनात येते. या परिस्थितीत आश्चर्यकारक गोष्ट घडली ती म्हणजे त्या भयानक संकटात जीव वाचणाऱ्यांमध्ये दोन कुत्र्यांची नोंद झाली. हे श्वान ब्रीड होते पोमेरेनिअन. बोटीतून प्रवास करणाऱ्या एका प्रवासी व्यक्तीकडे तीन पोमेरेनिअन कुत्रे होते. दुर्दैवाने त्यातील एकाचा मृत्यू झाला, मात्र दोन पोमेरेनिअन कुत्रे मृत्यूवर मात करत पुढील काही वर्षे जगले.
जर्मनीमध्ये जेम्स बोसव्हेल हे गृहस्थ पर्यटन करत असताना एका कुटुंबात त्यांना पोमेरेनिअन कुत्रा दिसला. २ नोव्हेंबर १७६४ साली जर्मनीमध्ये पोमेरेनिअन कुत्र्याची पहिली नोंद आढळली. कालांतराने क्वीन श्यॉब्लेट आणि क्वीन कोन्सोर्ट यांनी १७६७ साली इंग्लंडमध्ये हे कुत्रे आणले आणि त्याचे ब्रीडिंग सुरू केले. १८९१ मध्ये इंग्लंडमध्ये केनेल क्लब सुरू झाल्यावर इंग्लंडमध्ये या कुत्र्यांची पहिली नोंद झाली. आकार लहान आणि गोंडस चेहरा यामुळे दिसायला आकर्षक असल्याने हे ब्रीड लोकप्रिय झाले. जर्मनीमध्ये पोलंडजवळ जर्मन स्पीट्झ असे एक श्वान ब्रीड होते. पोमेरेनिअन कुत्रे हे त्यांचेच वंशज म्हणून ओळखले जातात.
‘टॉय ब्रीड’
इतर कुत्र्यांपेक्षा शरीरयष्टी फारच लहान आणि चेहरा दिसायला आकर्षक असल्याने कोणीही व्यक्ती या कुत्र्यांकडे पटकन आकर्षित होते. राखणदारीसाठी यांचा फारसा उपयोग होत नसल्याने यांना ‘टॉय ब्रीड’ म्हटले जाते. घरात विरंगुळा, मनोरंजन या कारणासाठी पोमेरेनिअन कुत्रे बहुतांश पाळले जातात. सोनेरी, काळा, करडा, साधारण निळा अशा रंगांमध्ये दिसणारा पोमेरेनिअन भारतातदेखील लोकांचे आवडते ब्रीड आहे. शोभिवंत कुत्रे म्हणून ओळख असल्याने घरात राखण्यापेक्षा शोभेसाठी या कुत्र्यांचा वापर करावा लागतो. परळ येथे राहणारे विवेक राणे यांनी पोमेरेनिअन कुत्र्यांचे ब्रीडिंग केलेले आहे. ज्या श्वानप्रेमींना हौसेसाठी, घरातील विरंगुळ्यासाठी कुत्रे पाळायचे असल्यास जगप्रसिद्ध असलेले पोमेरेनिअन अतिशय उपयुक्त ब्रीड आहे.
जास्त सूर्यप्रकाश नको..
पोमेरेनिअन कुत्र्यांच्या संपूर्ण शरीरावर लांब केस असल्याने थंडीत हे राहू शकतात, मात्र जास्त उष्ण वातावरण या कुत्र्यांना सहन होत नाही. धूळ, माती, पाऊस यांपासून या कुत्र्यांचा बचाव करावा लागतो. यासाठी पोमेरेनिअन कुत्रे घराबाहेरचे राखणदार म्हणून उपयुक्त नाहीत. घरात पाळले तरच हे जास्त चांगले राहतात. घरात पाळण्यासाठी किंवा केनेलमध्ये पाळण्यासाठी या कुत्र्यांचा उपयोग होतो. केनेलमध्ये पाळायचे असल्यास केनेल कोरडे असावे. जास्त सूर्याचा प्रकाश आत येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. फार उन्हाळा असल्यास केनेलमध्ये पंखा असावा लागतो.

बुद्धिवान, चपळतेची ख्याती
राखण करण्यासाठी पोमेरेनिअन कुत्रे उपयोगाचे नसले तरी हे बुद्धिवान आणि चपळ असतात. घरात एखादी अनोळखी व्यक्ती आल्यास त्यांना इजा करत नसले तरी आपल्या भुंकण्याने मालकास सजग करतात. आकाराने लहान असले तरी एखाद्या वॉचडॉगसारखे काम करतात. लपवलेली वस्तू शोधून काढण्यात हे कुत्रे चपळ असतात. गोजिरवाणे असल्याने कोणतीही व्यक्ती पटकन या कुत्र्यांवर रागावत नाही, मात्र आज्ञेत राहण्यासाठी मालकाचा थोडा धाक असावा लागतो.

वजन वाढल्यास श्वासोच्छ्वासास त्रास
इतर कुत्र्यांच्या तुलनेत पोमेरेनियन कुत्र्यांना खाणे प्रमाणात कमी दिले तरी चालते. या कुत्र्यांचे वजन वाढू न देण्याची काळजी मालकांना घ्यावी लागते. वजन वाढल्यास या कुत्र्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होतो. हाडे फार बारीक असल्याने वजन वाढीमुळे चालण्यासाठी त्रास होण्याची शक्यता असते. शरीरावर लांब केस असल्याने सतत ग्रुमिंग करणे गरजेचे असते. केसात गुंता झाल्यास त्यांना केस गळण्याचा त्रास उद्भवतो.