सकारात्मकतेमुळे करोना रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ

अंबरनाथ : करोनाचा संसर्ग झाल्याने शरीरापेक्षा रुग्णाच्या मनावर विपरीत परिणाम होत असून त्यामुळे रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मोठा अवधी लागतो. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अंबरनाथच्या दंत महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात आता मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशनाला सुरुवात करण्यात आली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रुग्णांना मार्गदर्शन केले जाते आहे. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जाते आहे. परिणामी करोना रुग्ण बरे होम्याची संख्या वाढली आहे.

दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांची स्थिती गंभीर झाल्याचे दिसून येते. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रुग्ण अत्यवस्थ होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. अशा वेळी एखाद्या कुटुंबातील एखादा सदस्य करोनाबाधित झाल्यास त्या रुग्णाचे मानसिक स्वास्थ्य बिघडू लागते. अनेकदा त्याचे परिणाम उपचार घेत असताना दिसतात. त्यामुळे बाधितांना वेळीच समुपदेशन मिळाल्यास त्यांच्यात सकारात्मकता निर्माण होऊ  शकते. त्याचा उपचारात फायदा होऊ  शकतो. हीच गरज ओळखून अंबरनाथ नगरपालिका संचालित दंत महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात आता ध्यानधारणा, समुपदेशनाला सुरुवात करण्यात आली आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेऊन रुग्णांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यासाठी पुण्यातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भक्ती वारे यांची निवड करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना मानसोपचाराची अत्यंत गरज आहे अशा रुग्णांसोबत दररोज संध्याकाळी टॅबच्या माध्यमातून डॉक्टरांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

अनेक रुग्ण मनमोकळेपणाने आपल्या समस्या, प्रश्न आणि ताणतणावाच्या गोष्टी डॉक्टरांसोबत खुलेपणाने बोलत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या मनात सुरू असलेली घालमेल, त्यांच्या मनाची अवस्था डॉक्टरांना कळू लागली आहे. त्याचा रुग्णांवर उपचार करताना फायदा होतो आहे. त्यामुळे रुग्ण उपचाराला योग्य प्रतिसाद देत आहेत. त्याचा थेट फायदा रुग्ण बरे होण्याच्या संख्येवर झाला आहे.

रुग्णालयात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी या ध्यानधारणेचा प्रयोग केला जातो आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयाचा परिसरही तणावमुक्त राहावा यासाठी प्रोत्साहन देणारी चित्रे, रंगरंगोटी, वनीकरण परिसरात करण्याचा मानस आहे. मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका