News Flash

वनराई बंधाऱ्यांअभावी कोटय़वधी लिटर पाण्याचा अपव्यय

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी या वस्तुस्थितीस दुजोरा दिला.

गेल्या वर्षी ठाणे जिल्हा कृषी विभागाने ८४४ वनराई बंधारे बांधले

अधिक पाऊस पडूनही पाणीटंचाईची भीती

जलयुक्त शिवार योजनेद्वारे अधिकाधिक जल संचयनाची मोहीम राबविणाऱ्या ठाणे जिल्हा प्रशासनाने यंदा पावसाळा संपून महिना उलटला तरी दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या वनराई बंधाऱ्यांच्या मोहिमेकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडूनही योग्य जलसंधारण न झाल्याने एप्रिल आणि मे महिन्यात जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी या वस्तुस्थितीस दुजोरा दिला. मात्र वारंवार संपर्क साधूनही जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वनराई बंधारे योजनेकडे दुर्लक्ष करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

पावसाळ्यात डोंगराळ भागातून वाहणाऱ्या ओढय़ा-नाल्यांचे पाणी अधिक काळ टिकून राहावे यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात वनराई बंधारे बांधले जातात. त्यामुळे एरव्ही डिसेंबरमध्ये आटणारे नाल्यातील पाणी पुढे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत टिकते. दुबार पिके घेणारे शेतकरी त्याचा लाभ घेतात. पाणी अडवल्यामुळे भूजल साठा वाढून परिसरातील विहिरींचा पाणीसाठा वाढतो. तसेच गुरांनाही या पाण्याचा उपयोग होत असतो. सर्वसाधारणपणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, गावकऱ्यांचे श्रमदान आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळणाऱ्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बंधाऱ्यांची कामे केली जातात.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण जिल्ह्य़ात वनराई बंधाऱ्यांची कामे केली जातात. गेल्या वर्षी हजारो बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले होते. मुरबाड, शहापूर,भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण या सर्व तालुक्यांमधील ग्रामीण भागात बंधारे बांधण्यात आले. त्याबद्दल राज्यात ठाणे जिल्हा प्रशासनाचे कौतुकही झाले. यंदा मात्र अद्याप एकही बंधारा बांधण्यात आलेला नाही.

गेल्या वर्षीचे चित्र

* गेल्या वर्षी ठाणे जिल्हा कृषी विभागाने ८४४ वनराई बंधारे बांधले. त्यामुळे सहाशे एकर जमीन ओलिताखाली आली. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडूनही जिल्ह्य़ातील ३२५ गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली नव्हती. या वनराई बंधाऱ्यांमध्ये ५०० टी. सी. एम. पाणी साठल्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली.

* ३२३ गावांमध्ये ८४४ वनराई बंधारे बांधले. या वनराई बंधाऱ्यांमधील पाण्याचा उपयोग करून शेतकऱ्यांनी भेंडी, काकडी, मिरची, ढोबळी मिरच्यांची पिके घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 1:52 am

Web Title: possibility of severe water scarcity in thane rural areas
Next Stories
1 रासायनिक सांडपाणी नाल्यावाटे नदीत
2 अंबरनाथमध्येही शिवसेनाच
3 एसटीच्या मार्गावर पालिकेची बससेवा
Just Now!
X