ठाण्यात पोस्ट ऑफिस सुरू होऊन १५९ वर्षे झाली आहेत. पहिले पोस्ट ऑफिस ठाणे रेल्वे स्टेशनजवळ एका चिरेबंदी कौलारू घरात सुरू झाले. आता त्याच जागेवर चार मजली नवी इमारत बांधून त्यात ठाणे जिल्हय़ातील सर्व टपाल खात्यांचे मुख्यालय केले आहे. पण गेल्या वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत टपाल खात्याला आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे महत्त्व मिळायचे, ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पुरते कमी झाले आहे.
पूर्वी दूरदेशी गेलेल्या आप्तमित्रांची ख्यालीखुशाली समजण्यासाठी विश्वासू निरोप्याची गरज भासत असे. तो तोंडी, वस्तुरूपाने अथवा चिठ्ठीने संवाद साधीत असे. श्रीमंत व व्यापारी लोक व्यावसायिक संदेशवाहक नोकरीला ठेवीत. ते पायी, कधी घोडय़ावरून, तर कधी जहाजातून प्रवास करून संदेश पोहोचवीत. सेनाधिकारी संदेशवहनासाठी प्रशिक्षित कबुतरे पाठवीत, तर राजेलोक खलिते पाठविण्यासाठी खास दूत ठेवीत. इंग्रजांची सत्ता आली आणि हे सारे चित्र बदलले.
१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे रेल्वे प्रथम धावली आणि आधुनिक युगाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या पंधरा वर्षांत रेल्वेने भारतातील प्रमुख शहरे जोडली गेली आणि रोजीरोटी मिळविण्यासाठी मजूर, निमकुशल, कुशल कामगारवर्ग शहराकडे धाव घेऊ लागला, कुटुंबासाठी पैसा गाठीशी जमा करू लागला. इंग्रजांनी राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून बाबू लोक जसे तयार केले तसेच लोकांच्या सोयीकरिता काही चांगल्या गोष्टीही केल्या. त्यांपैकीच एक म्हणजे पोस्टऑफिस किंवा टपाल खात्याची स्थापना होय. यामुळे सर्वसामान्यांपासून श्रीमंत व व्यापाऱ्यांनाही ती सोयीची झाली. ठाण्यातील पहिले पोस्ट ऑफिस इ.स. १८५६ साली ठाणे स्टेशनजवळ सुरू करण्यात आले. सुरुवातीला याचा सर्वाधिक फायदा व्यापाऱ्यांनाच झाला. टपालाद्वारे त्यांचा माल देशाच्या कानाकोपऱ्यात आणि देशाबाहेर त्यांना पाठवता येऊ लागला. टपालाबरोबर लवकरच तार खातेही सुरू झाले. २ जून १८७५ रोजी अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी तारेद्वारे ध्वनिप्रक्षेपण प्रथम केले. त्यानंतर अवघ्या सहा वर्षांत १८८१ सालात मुंबई-ठाण्यासह सर्व भारतभर तारयंत्र सुरू झाले. तारेमुळे काही क्षणांतच भारताच्या कानाकोपऱ्यात संदेश पाठवणे शक्य झाले. सुरुवातीला सरकारी कामकाजाकरिता आणि सैनिकी हालचालीसाठी त्याचा उपयोग केला जात असे, नंतर मात्र पोस्टातून तारेद्वारे संदेश पाठवणे सुरू झाले.
तार पाठवणे थोडे खर्चीक असल्याने अपघात, मृत्यू अशी काही विशेष घटना घडली तरच सर्वसामान्य लोक तारेचा उपयोग करीत. त्यामुळे पोस्टमनने घरी येऊन हातातला टंकलिखित तारेचा कागद पुढे केला, की त्यातला आशय समजून घेण्याआधीच घरात बायकांची रडारड सुरू व्हायची. स्वातंत्र्यानंतर ठाण्यात निरनिराळे लहानमोठे उद्योगधंदे सुरू झाले. लोकसंख्या झपाटय़ाने वाढू लागली. कामधंद्यासाठी आलेले चाकरमानी पोस्टात जाऊन गाठीला बांधलेला पैसा मनीऑर्डरने गावी पाठवू लागले. खुशालीच्या पत्रांची देवाणघेवाण वाढू लागली. कोर्ट-कज्जे वा महत्त्वाची कागदपत्रे रजिस्टर (नोंद) करून पाठवली जाऊ लागली. पत्रांबरोबरच वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, पुस्तके आणि लहानमोठी पार्सले, तिकिटांची विक्री, असा पोस्टाचा व्याप वाढू लागला. शिवाय गावागावांत, नाक्यानाक्यांवर ठेवलेल्या पोस्टाच्या डब्यात जमा झालेली पत्रे-पाकिटे, ठरावीक अंतराने जमा करून कार्यालयात आणावयाची, त्यांची त्या त्या स्थळांप्रमाणे वर्गवारी करावयाची, शिक्के मारायचे, मग ते भल्या मोठय़ा पिशवीत भरून पोस्टाच्या व्हॅनमध्ये ठेवायचे किंवा व्हॅनमधून आणलेल्या पिशव्या खाली उतरवून कार्यालयात न्यायच्या. अशी सतत पायाला भिंगरी लावून फिरणारे पोस्टमन तुटपुंजा पगार असूनही इमानेइतबारे विनातक्रार वर्षांनुवर्षे कामे करीत आले आहेत. तेव्हा त्यांना पोस्टमास्तर असे आदराने बोलले जायचे.
इंग्रजांनी टपाल खात्याची घडीच अशी बसवली होती की, कुठूनही पाठवलेली पत्रे भारताच्या कानाकोपऱ्यात त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत होती. त्यामुळे गेल्या शे-सव्वाशे वर्षांत अनुचित वा गैरकारभाराची एकही नोंद झाली नाही. स्वतंत्र भारतात निवडून आलेल्या प्रत्येक सरकारने महत्त्वाच्या अशा पोस्ट खात्याकडे दुर्लक्षच केले होते. त्यामुळे नाइलाजाने पोस्टमन लोकांनी २००५ साली संपाचा इशारा दिला. तत्कालीन सरकारला या संपाची दखल घ्यावी लागली आणि पोस्टमनना सिक्स्थ पेप्रमाणे पगारवाढ मिळाली.
ठाण्यात पोस्ट ऑफिस सुरू होऊन १५९ वर्षे झाली आहेत. पहिले पोस्ट ऑफिस ठाणे रेल्वे स्टेशनजवळ एका चिरेबंदी कौलारू घरात सुरू झाले. आता त्याच जागेवर चार मजली नवी इमारत बांधून त्यात ठाणे जिल्हय़ातील सर्व टपाल खात्यांचे मुख्यालय केले आहे, तर ठाण्याच्या मध्यवर्ती भागात नवीन पोलीस लाइनशेजारी गोशाला तलावासमोर ठाण्याच्या टपाल खात्याचे मुख्यालय असून त्याच्या बाजूला सिव्हिल हॉस्पिटलला लागून असलेल्या चिरेबंदी कौलारू इमारतीत गेली शंभर वर्षे ठाणे शहराचे टपाल खाते होते.
ठाण्याचा विस्तार आणि लोकसंख्यावाढीनुसार आता पोस्टाची विभागीय कार्यालये सुरू झाली आहेत. स्टेशनपलीकडे कोपरी कॉलनी, दमाणी इस्टेट, वागळे इस्टेट, सँडोज बाग, कोलशेत, बाळकूम, कासारवडवली, जे. के. ग्राम, अपना बाजार, पोखरण रोड नं. २, कळवा, मुंब्रा आदींचा यात समावेश आहे. ठाणे टपाल खात्याच्या प्रभारी प्रमुख चोंडकर मॅडम म्हणाल्या, टपाल खात्याने आता किसान विकासपत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, मुदतीची ठेव योजना, रिकरिंग डिपॉझिट, मासिक प्राप्ती योजना, सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम, सुकन्या योजना याबरोबरच टेलिफोन बिल, विजेचे बिल, गॅस सिलेंडर बिल इत्यादी सेवा योजना सुरू केल्या आहेत; पण ही कामे उरकायला मनुष्यबळ कमी पडते आहे.
आज मनीऑर्डर करण्यासाठी, रजिस्टरसाठी आणि स्पीड पोस्टसाठी पोस्ट ऑफिसमध्ये रोज रांगा लागतात. त्यासाठी जास्तीत जास्त संगणकाचा वापर व्हायला पाहिजे. या सर्व गोष्टींचा फायदा खासगी सेवा उद्योग संस्थांनी घेतला आहे. अनेक कुरियर कंपन्या टपाल खात्याचे काम हलके करू लागल्या आहेत; पण त्यात ‘डाकिया डाक लाया’चा निर्मळ आनंद नाही.