नेट मीटिरग योजना पथ्यावर; सर्व शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प
इमारतींवर सौरऊर्जा निर्माण करून ती महावितरणच्या ग्रिडमधून ग्राहकांना वितरित करण्याची ‘नेट मीटरिंग’ ही क्रांतिकारक योजना प्रत्यक्षात सुरू होताच ठाणे महापालिकेने आपल्या सर्व शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शाळांना विजेच्या आघाडीवर स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सौरऊर्जा निर्मिती अनेक वेळा महागडी ठरत असल्याने त्यासाठी फारसे कुणी पुढाकार घेताना दिसत नाही. मात्र, नेट मीटिरगद्वारे सौरऊर्जा साठवून ठेवण्याची संकल्पना बाद झाल्याने सोलर पॅनलमधून निर्माण झालेली वीज थेट महावितरण कंपनीच्या ग्रिडमध्ये पाठविता येणार आहे. या योजनेतील फायदे लक्षात घेऊन महापालिका शाळांना त्यामध्ये सामावून घेतले जाणार आहे, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून दररोज १००० युनिट विजेची निर्मिती होऊ शकेल, असा दावा उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी दिली. साधारणपणे या माध्यमातून २६७ किलो व्ॉट इतक्या क्षमतेची यंत्रणा उभी केली जाणार असून तेथून होणाऱ्या वीजनिर्मितीमुळे शाळांची विजेची गरज पूर्णपणे भागविता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी दोन कोटी ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ३० टक्के रक्कम केंद्र तसेच राज्य सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदानाच्या रूपाने महापालिकेस मिळणार आहे. तसेच महापालिका आणि महावितरणच्या संयुक्त माध्यमातून राज्यातील पहिली सोलर नेट मीटरिंग यंत्रणा नुकतीच वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयात सुरू करण्यात आली आहे.

‘नेट मीटिरग’चे फायदे
* एखाद्या इमारतीची विजेची गरज दिवसाला १०० युनिट असेल आणि तितकी वीज निर्माण झाली तर तेथील विजेचे बिल शून्य असेल.
* १०० पेक्षा अधिक युनिट निर्माण होऊन ते ग्रिडमध्ये पुरवले गेले तर अतिरिक्त युनिटचे पैसे ग्राहकाला मिळतील.
* वापरापेक्षा कमी विजेची निर्मिती झाल्यास फरकाचे बिल ग्राहकाला अदा करावे लागणार आहे. वीजनिर्मिती आणि प्रत्यक्ष वापर यासाठी वीज वितरण कंपनीमार्फत वेगवेगळे मीटर बसविले जाणार आहेत.