ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पदपथावर राहणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेने गुरुवारी एका बाळाला जन्म दिला. ती वेदनेने विव्हळत असल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. महिला आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचे कौतुक होत आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस पुलाखाली रेखा गुंजाळकर या राहतात. गुरुवारी सकाळी त्यांनी बाळाला जन्म दिला. रेखा वेदनेने विव्हळत होत्या. रस्त्यावरून चाललेल्या एका व्यक्तीचे लक्ष रेखा यांच्याकडे गेले. त्या व्यक्तीने याची माहिती ठाणेनगर पोलिसांना दिली. यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किशोर तरे, रवींद्र पांढरे, पोलीस शिपाई लक्ष्मण कांबळे आणि महेंद्र शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णवाहिका चालकाशी संपर्क साधून महिलेला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. यानंतर डॉक्टरांनी महिलेची नाळ कापली. बाळ आणि आईची प्रकृती स्थिर असून त्यांना पोलिसांनी आर्थिक मदतही केली आहे. या तत्परतेमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.