करोनामुळे दिलेल्या पॅरोलचा पोलिसांना ताप

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव कारागृहांमध्ये वाढून कैद्यांना लागण होऊ नये म्हणून जामीन अथवा पॅरोलवर कैद्यांना सोडण्यात येत असले तरी, ही ‘सुट्टी’ पोलिसांसाठी डोकेदुखी बनू लागली आहे. पॅरोल किंवा जामिनावर बाहेर पडलेल्या कैद्यांपैकी काहींनी नव्याने गुन्हेगारी कारवाया आरंभल्याचे ठाणे पोलीस आयुक्तालयात नुकत्याच उघडकीस आलेल्या काही प्रकरणांमध्ये उघड झाले आहे.

करोनाचा कारागृहातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने या कैद्यांना तात्पुरत्या पॅरोल किंवा जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सात वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा झालेले कैदी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १४ मे या दिवशी सरकारच्या उच्चाधिकार समितीने टाडा, पॉक्सो, मोक्का, एमपीआयडी वगळता हत्या, हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्य़ांतील आरोपींनाही सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अशा काही कैद्यांना सोडण्यात आले. असे असले तरी करोनाच्या सुट्टीवर असलेल्या यापैकी काही कैद्यांनी पुन्हा गुन्हा केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

काही दिवसांपूर्वी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात शिक्षा भोगत असलेल्या आकाश साहू याचीही ठाणे कारागृहातून सुटका झाली. त्याच्याविरोधात यापूर्वी आठ गुन्हे दाखल आहेत. सुटकेनंतर त्याने पुन्हा एकदा गुन्हेगारी करण्यास सुरुवात केली. वर्तकनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी त्याने चोरी केली. त्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटकही केली. याच गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याने वागळे इस्टेट भागात एका तरुणाला टोळीतील वादातून नग्न करून उठाबशा करायला लावल्या होत्या. या प्रकाराचे त्याने समाजमाध्यमावर चित्रीकरण केले होते. त्या प्रकरणातही श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. पुन्हा त्याला जामीन मिळाला.

मुंब्रा येथे घरफोडीप्रकरणी तळोजा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या मोहसीन चिरा याचीही सुटका झाली होती. त्याच्याविरोधात मारहाण, जबरी चोरी, घरफोडी असे १५ गुन्हे दाखल आहेत. सुटका झाल्यानंतर त्याने अमृतनगर परिसरात चोरी केल्याचे उघड झाले होते. त्याला पुन्हा अटक करण्यासाठी मुंब्रा पोलीस त्याचा पाठलाग करत होते. मात्र, मोहसीन पळ काढत असताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अशी काही प्रकरणे आता  पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

पोलिसांची बारीक नजर

ठाणे, कल्याण आणि तळोजा कारागृहातून १०७३ आरोपी सुटले आहेत. त्यातील ३१९ आरोपी यापूर्वी ठाणे पोलिसांनी अटक केले आहेत. या सर्व आरोपींचा अहवाल ठाणे पोलिसांकडे आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा आणि हद्दीतील पोलीस कर्मचारी या आरोपींवर लक्ष ठेवून असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

करोनाचा कालावधी संपल्यानंतर या आरोपींना पुन्हा कारागृहात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे पोलिसांसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. तसेच राज्य सरकानेही आता कारागृह, न्यायालये, पोलीस ठाणे येथील पायाभूत सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

– अ‍ॅड. सागर कदम, वकील