विरार येथील सभेत पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

पालघर पोटनिवडणूक

वसई : पालघर पोटनिवडणूक ही पंचरंगी आहे. भाजपकडे कार्यकर्ते नव्हते, उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे एकमेव नेते होते ते म्हणजे दिवंगत खासदार वनगा. परंतु वनगा कुटुंबीयांवर अन्याय झाल्याने ते भाजपचा त्याग करून शिवसेनेत गेले. भाजपला त्यांचा विसर पडल्याने लोकांमध्ये तिरस्कार आहे, राग आहे, यामुळेच भाजपला मते मिळणार नाहीत. काँग्रेस उमेदवार दामोदर शिंगाडा यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. म्हणूनच ही जागा काँग्रेसच प्रचंड मतांनी विजयी होणार, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विरार येथे झालेल्या सभेमध्ये व्यक्त केला.

पालघर पोटनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँगेस उमेदवार दामोदर शिंगाडा यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री याची जाहीर सभा विरार येथील नारिंगी येथे  झाली. या वेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले, पालघरमध्ये भाजपची ताकद नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, आमदार, आर्थिक ताकद लावूनदेखील मुळात ज्या प्रकारे भाजपने उमेदवार निवडला आहे त्यावरून त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत हे त्यांनी सांगितले आहे.

शासनाने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले आहेत यावर विचारले असता ते म्हणाले, केंद्र सरकारच्या एक्साईज डय़ुटी आहेत आणि राज्य सरकारचे व्हॅट जे वाढवलेले आहे ते कमी करा. हे जर कमी केले नाही तर याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे, त्यांचे खिसे खाली होत आहेत. यावरून सरकारला अर्थव्यवस्था सांभाळता येत नाही हे दिसून येते. २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासने दिली ती ते अजूनही पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले.