बदलापुरातील बेलवली भागातील नागरिकांमध्ये संताप

बदलापूर : बदलापुरातील बेलवली भागात असलेले रेल्वे फाटक बंद करून उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने हा मार्ग नेहमी अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे आजही अनेक नागरिक रेल्वे रूळ ओलांडून पूर्व-पश्चिम भागांत ये-जा करतात. मात्र आता रेल्वे प्रशासनाने आता हा मार्ग बंद करण्यासाठी येथे संरक्षक भिंती उभारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रेल्वे रुळावरून जीवघेणा प्रवास थांबला असला तरी पूर्व-पश्चिम प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना कोणताही दुसरा पर्याय दिल्याशिवाय घेतलेल्या या निर्णयांमुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

बदलापूर शहरातील रेल्वे रुळावरील फाटक गेल्या काही वर्षांत बंद करत रेल्वे प्रशासनाने बदलापूर स्थानक, बेलवली या भागांत पर्यायी व्यवस्था केली. रेल्वे स्थानक परिसरात तीन पादचारी पूल आणि एक स्कायवॉक, तर बेलवली भागात रस्तेमार्गासाठी भुयारी मार्गाची उभारणी केली. मात्र रेल्वे अभियंत्यांच्या आरेखनातील चुकांमुळे बदलापूर शहरातील रेल्वे रुळांच्या शेजारी असलेल्या नाल्याच्या खोलीपेक्षा भुयारी मार्गाची खोली अधिक झाली. त्यामुळे या नात्यातील पाणी कायम भुयारी मार्गात जमा होत असते.

पावसाळ्यात या भुयारी मार्गात पाच ते सात फुटांपर्यंत पाणी साचलेले असते. अनेकदा पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने यात बंदही पडली होती. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसली तरी अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग वापरापेक्षा जास्त दिवस पाण्याखालीच असतो. त्यात या भुयारी मार्गात पादचाऱ्यांसाठी विशेष पदपथ नाही. त्यामुळे भुयारी मार्गावर असलेले रेल्वे रूळ जीव मुठीत धरून ओलांडण्याशिवाय पादचाऱ्यांपुढे पर्याय नसतो.

रेल्वे प्रशासनाने रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वे रुळांशेजारी संरक्षक भिंती उभारण्याचे काम सुरू केले आहे. आता बेलवली येथेही संरक्षक भिंत उभारली जाते आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी सोयीचा ठरणारा हा मार्ग पूर्णत: बंद होणार आहे. याआधीच पाण्यात गेलेला भुयारी मार्ग तर आता बंद झालेला, तर रुळांवरचा प्रवासही बंद होणार आहे. पूर्व-पश्चिम प्रवासासाठी दोन किलोमीटरवरचा स्थानकशेजारचा उड्डाणपूल हा एकमेव मार्ग प्रवासासाठी उरणार आहे.

स्मशानभूमीचा रस्ताही बंद

अनेक दशकांपासून पूर्वेतील स्मशानभूमीचा रस्ताही या भिंतीमुळे कायमचा बंद होणार आहे. ही स्मशानभूमी खूप जुनी असून त्याचा वापर पश्चिम भागातील नागरिक करतात. त्यामुळे येथे ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग द्यावा यासाठी रेल्वे स्थानक प्रबंधकांना पत्र दिल्याचे भाजपच्या गणेश भोपी यांनी सांगितले आहे, तर स्थानिक शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रभाकर पाटील, शोभा पाटील, अविनाश देशमुख यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत पत्र दिले आहे.