रेमडेसिविरच्या गैरवापरावरही लक्ष

ठाणे : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यापाठोपाठ आता प्रशासनाने खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच गृह विलगीकरणातील रुग्णांच्या दोन्ही हातांवर शिक्के मारण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर रेमडेसिविरचा गैरवापर होत नसल्याची दक्षता घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

राज्यात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करोना परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन संसर्ग रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. पालिकेच्या परिमंडळ उपायुक्त दैनंदिन करोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर नियंत्रण ठेवत आहेत. यासंबंधीचा अहवाल दररोज मुख्यालयाकडे सादर करण्याच्या तसेच मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर कारवाई करून त्याचाही अहवाल मुख्यालयास सादर करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

करोना लक्षणे नसलेले अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. अशा रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून गृह विलगीकरणातील रुग्णांच्या दोन्ही हातांवर शिक्के मारण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. खासगी दवाखान्यातील अत्यवस्थ तसेच सहव्याधी असलेल्या रुग्णांबाबत दैनिक माहिती गोळा करण्यात येत असून त्यामध्ये रुग्णाचे नाव, वय, त्याला असलेल्या आजाराविषयीची माहिती, भ्रमणध्वनी क्रमांक, दवाखान्याचे नाव अशी माहिती घेतली जात असून त्याचा दैनिक अहवालही दररोज मुख्यालयाकडे सादर करण्यात येत आहे. तसेच त्या रुग्णाच्या उपचाराबाबतही माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, साहाय्यक आयुक्तांची पथके दवाखान्यास भेट देऊन रेमडेसिविर इंजेक्शनचा दवाखान्याने खरेदी केलेला साठा, वापरलेले इंजेक्शन आणि त्याच्या रिकाम्या कुप्या यांचा ताळेबंद पडताळून रेमडेसिविरचा गैरवापर होत आहे की नाही, याची तपासणी करीत आहेत.