जून महिन्याचा दुसरा आठवडा उलटल्यानंतर सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून उग्र रूप धारण करत शुक्रवारी ठाणेकरांना साफ झोडपून काढले. पावसाच्या माऱ्यामुळे उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्यांची ठाणे, कल्याण, डोंबिवली या स्थानकांवरच कोंडी झाली. रेल्वे बंद झाल्याने अनेकांनी बससेवेकडे धाव घेतली, मात्र पावसाचे पाणी जागोजागी तुंबल्यामुळे बस तसेच रिक्षा वाहतूकही विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना तुंबलेल्या रस्त्यांवरून पायपीट करत घर गाठावे लागले. ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीतही पावसाचा चांगलाच जोर दिसून आला. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडण्याच्या तसेच शॉर्टसर्किटमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या, मात्र कोठेही फार मोठय़ा हानीचे वृत्त नाही.
बुधवार सायंकाळपासून पावसाने अधूनमधून हजेरी लावायला सुरुवात केली होती, मात्र गुरुवारी रात्रीनंतर संततधार पाऊस सुरू झाला आणि म्हणता म्हणता ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील जनजीवन कोलमडून पडले. ठाणे शहरातील नौपाडा, वंदना टॉकिज परिसर, हरिनिवास चौक, वाघबीळ या ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पावसाचा जोर पाहून महापालिकेनेही सर्व शाळांना सुटी जाहीर करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिल्याने अनेकांनी घरातच राहणे पसंत केले, मात्र तरीही सकाळच्या सुमारास ठाण्यापुढील सर्व स्थानकांवर प्रवाशांची दुप्पट गर्दी दिसून येत होती. मुंबईत शीव, चुनाभट्टी तसेच कुर्ला या स्थानकांदरम्यान पाणी साचल्याने सकाळपासूनच रेल्वेची वाहतूक बंद पडली होती, तर ठाणे-वाशी ट्रान्सहार्बर सेवा अतिशय धिम्या गतीने सुरू होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेसेवा बंद झाल्याचे पाहून घराकडे परतणाऱ्यांची वाटही पावसाने रोखून धरली. यंदाच्या मोसमातील पहिल्याच मोठय़ा पावसात महापालिकांच्या नालेसफाई आणि रस्तेकामाचे दावे वाहून गेले.