मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची टीका; मतांसाठी परप्रांतीय झोपडय़ांना संरक्षण

राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकांच्या काळात मोठी विकासाची स्वप्ने दाखवून शहरांसाठी मोठय़ा रकमेची पॅकेज जाहीर केली.  राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. निवडणुकीच्या काळात वाट्टेल तसे बोलायचे आणि प्रत्यक्ष कृती करायची नाही अशी टीका मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केली.  स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवून लोकांना मूर्ख बनविण्याचे काम भाजपने केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्व आणि मतांसाठी परप्रांतीय निवासी झोपडय़ांचे संरक्षण करणारे हेच आहेत अशी  टीका करत राज यांनी भाजप आणि शिवसेनेला लक्ष्य केले.

कल्याण, डोंबिवलीतील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज शहरात आले आहेत.  देशातील आर्थिक परिस्थिती काय आहे. ही वस्तुस्थिती सांगण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. लोकांना फक्त स्वप्ने दाखविली जात आहेत. लोकांना असे किती काळ मूर्ख बनविणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. प्रमाणपत्रे दिली. आता त्यांच्या खात्यात दमडी जमा होत नाही. स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखविलीत आणि निधीचा पत्ता नाही. हे सगळे स्वप्नवत बुडबुडे एक दिवस फुटणार आहेत, असे राज म्हणाले.

निवडणुका आल्या की यांना हिंदुत्व आठवते. पण सेनेची सत्ता असलेल्या पालिका अधिकाऱ्यांच्या समोर पाकिस्तानी, बांगलादेशी, रोहिंग्यांच्या वस्त्या वाढल्यात. प्रामाणिक रहिवाशाला आधार, शिधापत्रिकेसाठी धावाधाव करावी लागते. पण, परप्रांतीयांना झटपट सुविधा. प्रामाणिक रहिवाशांची नावे मतदार यादीतून गायब कशी होतात असा सवाल त्यांनी केला. झोपडीधारकांची एकगठ्ठा मते मतदार यादीत, हे कोण करतेय, असे सांगत राज यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.

देशातील अर्थव्यवस्था सुरळीत असताना मध्येच जीएसटी आणली. आर्थिक व्यवहाराचे इंजिन बंद पाडले आणि लोकांना हैराण करून आता त्यांनाच धक्का मारण्यास भाग पाडले जातेय. रेल्वे स्थानक भागातून फेरीवाले हटविल्याने लोक समाधानी आहेत. चांगले केले त्याचे कौतुक नाही  याउलट त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आल्या आहेत. याविषयी अन्य कोणी पक्ष तोंड उघडण्यास तयार नाही. प्रशासन ज्यांच्या हातात आहे त्यांनी हे करायचे असते. फेरीवाल्यांच्या उलाढालीतून दोन हजार कोटींचा मलिदा जमा होत असेल तर कसे हटणार आणि हटविले जाणार फेरीवाले, असा प्रश्न राज यांनी केला.

विरोधी पक्ष कधीच जिंकत नसतो. सत्ताधारी हा पराभूत होत असतो. या तत्त्वाप्रमाणे साडेतीन वर्षांपूर्वी देशात घडले. मोदींना जिंकून आणण्यात पन्नास टक्के वाटा राहुल गांधी यांचा होता. गुजरातमध्ये दीडशेहून अधिक जागा भाजपला मिळाल्या तर ते मतदान यंत्रांचे मोठे काम असेल, असे राज  म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या विषयावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.

..तर २०५० पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना संरक्षण द्या

अनधिकृत बांधकामांना संरक्षण टप्प्याने देण्याऐवजी एकहाती २०५० पर्यंत सर्वच अनधिकृत बांधकामांना सरकारने संरक्षण देऊन टाकावे, असे उद्विग्नपणे ते शासनाच्या बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्याच्या विषयावर म्हणाले.