कल्याण डोंबिवली परिसरात दर महिन्याला किमान पाच ते सहा ज्येष्ठ नागरिक दुचाकीस्वारांनी दिलेल्या धडकेमुळे जायबंदी होतात. या अपघातात त्या ज्येष्ठ नागरिकांचे हाता-पायाचे हाड मोडते. दर महिन्याला दोन युवक दुचाकी चालविताना वेगावर नियंत्रण न राहिल्याने स्वत: पडून किंवा दुसऱ्या वाहनाला धडक देऊन मृत्युमुखी पडतात. वाहतुकीचे नियम पाळले, वेगावर नियंत्रण ठेवले तर अशा दुर्घटना टाळल्या जाऊ शकतात..

शहरी भागातील वर्दळीच्या रस्त्यांवर सुलभ प्रवासासाठी दुचाकी कधीही उपयोगी ठरते, मग ती स्कूटर असो वा मोटरसायकल. या वाहनाचा वेग मर्यादित ठेवला तर प्रवासाचा पल्ला सुखरूपपणे पार पाडता येतो. चाळीस वर्षे एकच दुचाकी वाहन चालविणारे अनेक पट्टीचे चालक आजही पाहावयास मिळतात. कधी त्यांना दुचाकी चालविताना खरचटल्याचे ऐकावयास मिळत नाही. यापूर्वी प्रवासाची साधने कमी होती. त्या वेळी फटफटी नावाचा दुचाकीचा प्रकार होता. ही फटफटी नेहमीच्या रस्त्यांबरोबरच अगदी अडगळीच्या डोंगरदऱ्यात धुळीने भरलेल्या रस्त्यावर वापरली जात होती. चालविणारा सजग असेल, केवळ साधन म्हणून तो त्या वाहनाचा उपयोग करीत असेल तर तो जीव, वाहन सांभाळून प्रवास करतो.

यापूर्वी सहसा दुचाकीवरून कुणी पडून मरण पावल्याचे ऐकिवात नव्हते. साहजिकच दुचाकीवरील अपघातांचे प्रमाण अतिशय कमी होते. गेल्या काही वर्षांत मात्र या अपघातांमध्ये कमालीची वाढ झालेली दिसून येते.

कल्याण, डोंबिवलीचा विचार केला तर कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात (आरटीओ) पाच ते सहा लाख दुचाकी वाहने आहेत. यामधील पावणेदोन ते सवादोन लाख दुचाकी फक्त कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांत आहेत. गुंठेवारीतून मिळालेला रग्गड पैसा, घरात येणारे दोन व त्याहून अधिक पगार. त्यामुळे चारचाकी आईबाबांसाठी आणि दुचाकी लाडावलेल्या पोरांसाठी, असे एक सूत्र हल्ली पाहण्यास मिळते. भले घरासमोर, इमारतीखाली वाहने उभी करण्यास वाहनतळ नसेल; पण वाहन पाहिजे. ही जीवघेणी स्पर्धा शहराचे वाहतूक नियोजनाचे, पर्यावरणाचे आरोग्य बिघडवीत आहे. ‘आरटीओ’ कार्यालयात दररोज प्रशिक्षणार्थी वाहनचालक म्हणून परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या १४० जणांमध्ये निम्म्याहून अधिक संख्या ही तरुणांची असते. १८ ते ३० वयोगटातील हा तरुण असतो. आता तर जागोजागी शिबिरे (कॅम्प) घेऊन ‘आरटीओ’ने वाहन प्रशिक्षणार्थीना त्यांची परीक्षा न घेता परवाने देण्याची पद्धत सुरू केली आहे. हे परवाने म्हणजे तरुण वाहनचालकांची फुकटची फौज उभी करण्याचा प्रयत्न आहे.

महाविद्यालयात शिकणारे बहुतेक तरुण गरजेपेक्षा केवळ दुसऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी, समोरच्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दुचाकी वाहन बाळगताना दिसतात. एकदा का ‘आरटीओ’चा परवाना हातात आला, की बहुतेक तरुण एकेका दुचाकीवर तीन ते चार जण बसून बेभान होऊन दुचाकी चालवितात. मौज, थिल्लरपणा एवढेच त्यांचे लक्ष्य असते. वेडेवाकडे कापलेले डोक्यावरील केस, ते दुचाकी धावेल त्याप्रमाणे हलले- डुलले पाहिजेत, रस्त्यावरून वाहने ये-जा करीत असताना त्या वाहनांच्या मधून रस्ता कापत पुढे जाणे, हुलकावणी देत वाहन दामटणे, असे उपद्व्याप करीत एखादे ठिकाणी ही भरधाव वेगात असलेली दुचाकी कोठे तरी वेग नियंत्रणात न आल्याने गतिरोधकावर आपटते. त्यामुळे दुचाकीवरील स्वार जायबंदी होतात. या अपघातात अनेकदा रस्ता ओलांडत असलेल्या एखाद्या काकांना, आजोबांना या उडाणटप्पू दुचाकीस्वारांनी गंभीर जखमी केलेले असते.

आपल्या चुकीमुळे एक व्यक्ती गंभीर जखमी होऊन भर रस्त्यात पडली, याचे कोणतेही सोयरसुतक न बाळगता हे दुचाकीस्वार तिथून पळ काढतात. त्यामुळे त्यांना कठोर शासन व्हायला हवे, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. कर्णकर्कश भोंगे वाजवत सामूहिकपणे वर्दळीच्या रस्त्यांवर भरधाव गाडय़ा हाकणाऱ्या तरुणांची वाढती संख्या हा गंभीर विषय आहे. या मृत्यूच्या सौदागरांना वाहतूक विभागाने आवरावे, अशी अपेक्षा जागृत नागरिक व्यक्त करीत आहेत. या दुचाकीस्वारांमुळे दिवसभर कार्यालयात काम करून रात्री निवांतपणासाठी घरी आलेल्या चाकरमानी रहिवाशांच्या झोपेचे खोबरे होऊन जाते. रात्रीचे भोजन झाले की, अनेक तरुण मित्रांबरोबर झुरका मारण्यासाठी, आइस्क्रीम खाण्याच्या नावाखाली घराबाहेर पडतात. मग इमारतीखाली मित्राची फडफड दुचाकी सज्ज असते. एकेका दुचाकीवर तीन तीन जण बसून, कर्णकर्कश आवाज करीत हे स्वार रात्री उशिरापर्यंत कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांवरून येरझाऱ्या घालीत असतात.

दुचाकीवरून लटकून प्रवास करणारे उडाणटप्पू तरुण बिनधास्तपणे दिवसा वाहतूक पोलिसांच्या समोरून वेगाने निघून जातात. त्यांना अडविण्याची हिंमत वाहतूक सेवक किंवा पोलीस करीत नाहीत. याउलट वाहतूक पोलिसाच्या समोरून आपण कसे दिमाखात पुढे पळून गेलो, अशी शेखी मिरविण्यात त्यांना आनंद वाटतो. त्यात महाविद्यालयीन तरुणांची बहुसंख्या असते.

दुचाकीवर बसल्यानंतर स्वाराला मोटार वाहन कायद्याचे सर्व नियम लागू होतात; पण या कायद्याची कठोर अंमलबजावणी ‘आरटीओ’, वाहतूक विभागाकडून केली जात नाही. अलीकडे मोटार वाहन अधिनियमात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या कायद्याची अंमलबजावणी आरटीओ, वाहतूक विभागाने केली, तर ‘पायी जाऊ, पण वाहन नको’ अशीही परिस्थिती येऊ शकते, एवढे हे कायदे कठोर आहेत. फक्त आरटीओ अधिकाऱ्यांनी आपल्या वातानुकूलित दालनात न बसता या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी थेट रस्त्यावर उतरायला हवे. शासनाने ‘आरटीओ’ कार्यालयांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले तर बेशिस्त दुचाकींबरोबर अन्य वाहनचालकांवर कठोर कारवाई करणे अधिकाऱ्यांना शक्य होईल. वाहतूक पोलिसांनी केवळ रेतीवाहू डंपरमधील क्लिनरशी ‘हस्तांदोलन’ करणे, दुचाकीस्वारांना बाजूला घेऊन तडजोडी आणि वाहतूक विभागाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या नादात बेशिस्त वाहनचालकांना अजिबात पाठीशी घालू नये. वाहतूक पोलिसाच्या हातावर ‘दक्षिणा’ दिली की काहीही होत नाही, हा बेशिस्त दुचाकीस्वारांचा गैरसमज दूर करण्यासाठी वाहतूक अधिकाऱ्यांनी कंबर कसली पाहिजे. यापूर्वी डॉ. रश्मी करंदीकर ठाणे विभागाच्या वाहतूक पोलीस उपायुक्त होत्या. त्यांची नियमित कल्याण, डोंबिवली परिसरांत फेरी, अधिकाऱ्यांची झाडाझडती असायची. वाहतूकविषयक वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल त्या घेत होत्या. आता वाहतूक विभागाचे ‘दीप’ उगवतात केव्हा आणि मालवतात केव्हा तेही कळत नाही. त्यामुळे स्थानिक वाहतूक अधिकारी सुस्तावले आहेत. वाहतूक सेवक वाहतूक पोलिसांची ‘सेवा’ करण्यात अधिक गर्क असतात. शहरातील दुचाकींची संख्या बेसुमार वाढत आहे. या सगळ्या बेशिस्तीचा गैरफायदा बेशिस्त दुचाकीस्वार घेतात. या स्वारांना ‘आरटीओ’, वाहतूक विभागाने आताच आवर घातला नाही, तर सर्वसामान्यांना जखमी करण्यात, चिरडण्यास हे दुचाकीवरचे यमदूत मागेपुढे पाहणार नाहीत.