News Flash

सार्वजनिक गणेशोत्सवात नागरिकांचे हाल

ठाणे पाचपाखाडी परिसरातील पाइपलाइन रस्त्यावर गुरुकुल सोसायटीचा बस थांबा आहे. लवकरच हा रस्ता अवजारांच्या साहाय्याने खणला जाईल.

| August 19, 2015 12:22 pm

reporter-readrsसार्वजनिक गणेशोत्सवात नागरिकांचे हाल

ज्ञानदेव कुळकर्णी, ठाणे

काही गाडय़ा भरून मोठमोठय़ा बांबूंचा ढीगही या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होईल. या रस्त्यात नरवीर तानाजी मंडळाचा गणपती बसतो. मंडळाकडून बसवण्यात येणारा हा गणपती या विभागातील लाखो रहिवाशांची फार मोठी अडचण आहे. परिसरातील हा रस्ताही अरुंदच आहे. पाचपाखाडी परिसरातील हा मुख्य रस्ता असल्याने त्यावर नियमित दुहेरी वाहतूक सुरू असते. बाजूच्या दोन गल्ल्यांमध्ये रुग्णालये आहेत तर जवळच एक शाळासुद्धा आहे. शेजारीच कचराळी तलावही आहे. एकंदरीतच काय पाचपाखाडीचा हा परिसर रहदारीचा आहे.रस्त्याची सात ते आठ फुटांएवढीच जागा गणेशोत्सवादरम्यान मोकळी सोडण्यात येते. जवळच असलेल्या बस थांब्यावर बस आली की, प्रवाशांची या ठिकाणी गर्दी होते. बसच्या दुतर्फा अन्य वाहनांचाही गराडा पडतो. या रस्त्याने पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र अरुंद पदपथावरून आपली वाट काढत जावे लागते. एकंदरीतच काय भर रस्त्यात गणपती बसवून, नागरिकांची गैरसोय करून, मंडळ उत्सवांचे छान दर्शन समाजाला देत आहे. या गणपतीच्या स्थापनेमुळे नागपंचमी ते अनंत चतुर्दशी आणि आणि त्यानंतरचे पाच ते सहा दिवस असा तब्बल दीड महिना येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.गणपतीसाठी उभारला जाणारा मंडप हाही तितकाच त्रासदायक प्रकार. इमारतीच्या दोन मजल्याहून अधिक उंचीचा आणि अध्र्याहून अधिक रस्ता व्यापेल इतक्या रुंदीचा हा मंडप. मंडपापासून ते ज. अरुणकुमार वैद्य रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूंना खड्डे पाडून मोठे खांब रोवून रोषणाई केली जाते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंस असणारी झाडे रोषणाईसाठी तोडली जातात. गणेशोत्सव झाल्यानंतरही रस्त्यावर खणण्यात आलेले खड्डे तसेच असतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मंडळाचे संस्थापक बडे नामांकित लोकप्रतिनिधी आहेत. या मंडळाने गेली कित्येक वर्षे आबालवृद्ध आणि सर्व नागरिकांचीही वार्षिक छळवणूक सुरू ठेवली आहे. लोकशाहीची ही तीव्र थट्टाच म्हणावी लागेल.

विजेच्या लपंडावामुळे नाहक त्रास
दिनेश म्हसकर, बदलापूर
बदलापुरात पावसाळा सुरू झाल्यापासून महावितरण वीज कंपनीच्या वीजपुरवठय़ाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचा आम्हाला दुहेरी त्रास होत आहे. एक तर, नागरिक म्हणून भारनियमनाच्या व्यतिरिक्त वीज गेल्याने घरची कामे खोळंबत आहेत. तर, अवेळी वीज गेल्याने दुकानातील यंत्रे निकामी होत आहेत. याचा साहजिकच फटका व्यावसायिकांना बसतो. पावसाळ्यापूर्वी शहरात महावितरणने मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी शुक्रवारी भारनियमन सुरू केले असल्याचे समजले होते. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर, जोरदार पावसात एकही दिवस असा गेला नाही की, वीजपुरवठा खंडित झाला नाही. त्यातच गेले काही दिवस अचनाकच वीज जात असून याचा परिणाम व्यावसायिक म्हणून आमच्या दुकानातील छपाईच्या यंत्रांवर पडत आहे. तसेच व्यवसाय करताना इंटरनेटचीही तितकीच आवश्यकता असून ते विजेअभावी खंडित झाल्याने कामाचा खोळंबा होत आहे. या विजेच्या लपंडावामुळे व्यक्तिश: अनेक कामाचे तास वाया गेल्याने व्यवसाय तर कमी झालाच आहे. मात्र शहरातील अन्य व्यवसाय बंधूंकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनाही या समस्येचा त्रास होत असल्याचे कळते आहे. दुकानांच्या बरोबरीनेच कुटुंबीयांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने आमच्या मन:स्तापात अधिक भर पडत आहे. याबाबत महावितरणच्या कार्यालयात विचारणा केली असता, त्यांच्याकडून कार्यालयाचे फोन उचलले जात नाहीत किंवा फोन उचलले असता भिवंडी, पडघ्यावरून ट्रिप झाले आहे, असे परवलीचे उत्तर मिळते. महावितरणने प्रथम या पडघा, भिवंडी येथील यंत्रणेची व शहरातील यंत्रणेची डागडुजी करावी. तसेच आम्ही कर्ज काढून आमचे व्यवसाय करत असून आम्हाला अशा नाहक त्रासांमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आमच्या आर्त हाकेला महावितरणने साथ द्यावी व बदलापुरातील विजेच्या लपंडावाची समस्या तात्काळ सोडवावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 12:22 pm

Web Title: readers reports
टॅग : Badlapur
Next Stories
1 २७ गावांमधील वातावरण तापले
2 रस्ते अडवणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
3 ठाण्यात आता प्लॅस्टिकपासून तेलनिर्मिती
Just Now!
X