19 November 2019

News Flash

खाऊखुशाल- आइस्क्रीम निर्मितीचा लज्जतदार सोहळा

लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सारेच आईस्क्रीमचे वेडे असतात.

आईस्क्रीम म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतच. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सारेच आईस्क्रीमचे वेडे असतात. त्यातच आता विविध चवींचे, आकारांचे, रंगांचे आईस्क्रीम बाजारात उपलब्ध असल्याने आबालवृद्ध नेहमीच या पदार्थाची मागणी करताना दिसतात. परंतु तुम्ही केवळ काही मिनिटांत तुमच्या डोळ्यांसमोर ताज्या फळांपासून तयार केलेलं आयस्क्रीम खाल्लं आहे का? अशी कल्पना पणं केली नसेल ना.. अशी संकल्पना ठाण्यातील विनीता शिधये यांच्या ‘रोल दी स्टफ’ या आयस्क्रीम पार्लरने बाजारात आणली आहे. दक्षिण कोरिया या देशामध्ये अशा प्रकारे लाइव्ह आईस्क्रीमचा उगम झाला आणि आता अशा प्रकारचे आईस्क्रीम ठाण्यातील चरई विभागातील ‘रोल दी स्टफ’ने खवय्यांसाठी उपलब्ध केले आहे.

‘लाइव्ह’ आईस्क्रीम म्हणजे काय?

तयार आईस्क्रीममध्ये कोणते जिन्नस वापरले आहेत याबाबत फारशी माहिती खवय्यांना नसते. खाद्यप्रेमी काय खाणार हे त्यांना प्रत्यक्ष कळावे, या उद्देशाने ही संकल्पना दक्षिणेकडील देशांमध्ये सुरू झाली. लाइव्ह आईस्क्रीममध्ये दूध व त्याबरोबर ज्या चवीचे आईस्क्रीम असेल ‘तो’ पदार्थ (आंबा, संत्र, चॉकलेट आदी) व अंड असे एकत्र करून एक विशिष्ट अशा यांत्रिक तव्यावर तयार केलेले मिश्रण ओतून दोन पसरट पलित्यांच्या साहाय्याने मिश्रण एकजीव करून, ते तव्यावर पसवले जाते. काही सेकंदांमध्ये ते गोठण्यास सुरुवात होते. हे यंत्र काही सेकंदांमध्ये -३० अंश तापमानावर थंड होते. त्यामुळे ओतलेल्या मिश्रणाचे चटकन आईस्क्रीम तयार होते. त्यानंतर त्याचे रोल करून खवय्याला ताज्या आणि पौष्ठिक अशा आईस्क्रीमचा नजराणा दिला जातो.

शिधये यांच्याविषयी..

खवय्यांना शाकाहारी आणि केमिकलविरहित आईस्क्रीम देण्याचा संकल्प ठाण्यातील विनीता शिधये यांनी केला. त्यांचा मुलगा व सून सतत कामानिमित्त थायलंड, तैवान, कोरिया आदी ठिकाणी परदेशी दौरे करत. त्यादरम्यान त्यांनी अशा प्रकारचे आईस्क्रीम पाहिले व हे आपल्याही शहरात असावे अशी उम्मेद निर्माण झाली व त्यांनी आईसाठी हा व्यवसाय सुरू करून दिला.

रोल दी स्टफ

शॉप नं.५, धरोड कॉ. हाऊ. सोसा, एल्डजी रोड, दैनिक किचनजवळ, चरई, ठाणे (प.)

वेळ- दररोज, दुपारी १२ ते रात्री १२

येथे काय मिळेल?

दाक्षिणात्य पद्धतीचे भारतीय आईस्क्रीम-देसी सण्डे

गुलाबजामून, गुलकंद, गाजर हलवा, जिलेबी हे सर्वाच्या मनावर राज्य करणारे भारतीय गोडाचे पदार्थ. या पदार्थाना घट्ट दुधाच्या मिश्रणामध्ये घोळवून अस्सल भारतीय गोडाचे आईस्क्रीम येथे मिळते. याचे वैशिष्टय़ म्हणजे हे सर्व पदार्थ शिधये घरी तयार करतात.

परदेशी चवीचे-विलायती सण्डे

पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या प्रकारचे आईस्क्रीम मिळतात तशाच प्रकारचे काही आईस्क्रीम स्वत: शिधये यांनी खवय्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये ओरियो, रेड वेल्वेट, चॉकलेट ब्राऊनी, नटेला, चीजकेक सण्डे यांसारखे आईस्क्रीम येथे मिळतात.

ताज्या रसदार फळांपासून तयार केलेले- फ्रेश फ्रुट आईस्क्रीम

यामध्ये आंबा, स्ट्रॉबेरी, किवी, संत्री, लिची, अननस अशा फळांच्या रसाचा वापर करून आईस्क्रीम तयार केले जाते. येथे मिळणाऱ्या आंब्याचे आईस्क्रीम खाणारा वर्ग सर्वाधिक आहे, कारण येथे मिळणाऱ्या आईस्क्रीममध्ये शिधये यांच्या तळघर येथील बागेतून येणारा आंब्यांच्या रसाचा वापर केला जातो.

काही वैशिष्टय़पूर्ण आईस्क्रीम-स्पेशल सण्डे

चॉकलेट ओव्हर डोस- हे आईस्क्रीम त्याच्या नावप्रमाणेच पुरेपूर ‘ओव्हर’ आहे. यामध्ये चोकोपाय, किटकॅट, जेम्स, चॉकलेट

चिप्स, चॉकलेट सिगार, ओरियो चॉकलेट, हर्बीस असे आठ प्रकारच्या चॉकलेटचा वापर केला जातो. हे आईस्क्रीम खाण्यासाठी कॉलेजिअन्स ग्रुपमध्ये येतात.

राजभोग- यामध्ये केशर घातलेल्या

दुधामध्ये  काजू, बदाम, पिस्ता आदी सुकामेवा घालून हे मखमली असे आईस्क्रीम तयार करण्यात येते.

First Published on January 2, 2016 2:19 am

Web Title: recipe of ice cream creation
Just Now!
X