News Flash

लस घेण्यापूर्वीच लसीकरण झाल्याची नोंद

 गेल्या काही महिन्यांमध्ये लशीची उपयुक्तता अधिक प्रभावीपणे समोर आल्याने नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील करवले केंद्रावरचा प्रकार, नागरिकांमध्ये संताप

अंबरनाथ : लशींच्या अपुऱ्या साठय़ामुळे एकीकडे नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहून लस घेण्याची वेळ आली असतानाच रांग लावूनही लस घेण्यापूर्वीच लसीकरणाची ऑनलाइन नोंद झाल्याचा प्रकार अंबरनाथ तालुक्यातील करवले लसीकरण केंद्रावर समोर आला आहे. अंबरनाथमधील बारकूपाडा येथे राहणारे अशोक जाधव यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. एकीकडे लशींच्या पुरवठय़ाअभावी लसीकरण लांबत असताना या प्रकारामुळे जाधव यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. त्यामुळे लसीकरण प्रक्रियेतील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये लशीची उपयुक्तता अधिक प्रभावीपणे समोर आल्याने नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी शहरी भागात लसीकरणाची सर्वच केंद्रे गर्दीने भरलेली असत. त्यामुळे अनेकांनी लशीसाठी ग्रामीण भागात धाव घेतली होती. मात्र आता ग्रामीण भागातही लस घेण्यासाठी गर्दी होऊ  लागली आहे. अंबरनाथ शहरातही अनेकदा लसीकरण केंद्र लशींअभावी बंद असते. तर अनेकदा गर्दीमुळे अनेकांना लस घेता येत नाही. त्यामुळे अनेक जण आजही लस घेण्यासाठी ग्रामीण भागातील केंद्रांना प्राधान्य देतात. मात्र ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी जाण्याचा आग्रह अंबरनाथ शहरातील एका नागरिकाला मनस्ताप देऊन गेला आहे. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील बारकूपाडा येथे राहणारे अशोक जाधव हे सुरक्षारक्षक म्हणून खासगी कंपनीत कार्यरत आहेत. नातेवाईकांनी माहिती दिल्याने त्यांनी लसीकरणासाठी अंबरनाथ तालुक्यातील करवले या ग्रामीण लसीकरण केंद्रांवर धाव घेतली. या ठिकाणी तब्बल पाच तास ते लसीकरणासाठी रांगेत थांबले. मात्र गर्दीमुळे त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. मंगळवारी पुन्हा ते लसीकरणासाठी गेले असता त्यांच्या नावे आधीच लस घेतल्याची नोंद झाल्याची माहिती त्यांना केंद्रावर दिली गेली. लस न घेताच आपल्या नावे लस घेतल्याची नोंद झाल्याने त्यांना धक्का बसला. काही वेळात त्यांच्या मोबाइलवर लस घेतल्याचा संदेशही त्यांना प्राप्त झाला. त्यामुळे दोनदा लसीकरण केंद्रावर जाऊनही लस न मिळाल्याने जाधव यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

या प्रकरणी जाधव यांनी लसीकरण केंद्रावर तक्रार केली असता येत्या दोन दिवसांत त्यांना लस दिली जाईल असे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर मांगरूळ आरोग्य केंद्राच्या अधिकारी विजया पोडे यांना विचारले असता लसीकरणाच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता असून याबाबत वरिष्ठांना कळवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:45 am

Web Title: recorded vaccination before vaccination ssh 93
Next Stories
1 निर्बंध आणखी शिथिल करू नका!
2 लशींच्या ‘टोकन’मध्येही राजकीय वाटमारी
3 पाणीपुरवठय़ाच्या आर्थिक भारापुढे पालिकेची दमछाक