जिल्ह्यात पुरेसा साठा असल्याची ग्वाही; इंजेक्शन मिळवण्यासाठी धावाधाव सुरूच

बदलापूर: गंभीर करोनाबाधितांना दिलासादायक ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्दोष पुरवठय़ासाठी पुरवठादार आणि रुग्णालयांच्यात समन्वय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियंत्रण कक्ष आणि अधिकाऱ्यांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. मात्र या कक्षाशी संपर्क केल्यानंतर रेमडेसिवीर मिळणे तर दूरच, पण जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलणाऱ्या रुग्णालय आणि डॉक्टरांविरुद्ध कारवाईसाठी तक्रार देण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या संतापात भर पडत असून काळाबाजारातून रेमडेसिवीर खरेदी करण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नसल्याचे चित्र आहे.

करोनाचा संसर्ग झालेल्या अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन जीवदान ठरते आहे. मात्र गेल्या काही आठवडय़ांपासून या इंजेक्शनच्या तुटवडय़ामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काळाबाजारात या इंजेक्शनची विक्री वाढल्याचे समोर आले होते. हा काळाबाजार रोखून पारदर्शकपणे पुरवठा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी निरीक्षकांचे संपर्क जाहीर केले होते. त्या क्रमांकावरूनही नागरिकांना आश्वासनच मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्यानंतर १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी १५ अधिकाऱ्यांची तीन पाळ्यांमध्ये विभागणी करून नियंत्रण कक्षाची स्थापना केली. यावेळी मदत कक्षात दोन दूरध्वनी क्रमांक आणि एक टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आला. मात्र या क्रमांकावर सर्वसामान्यांनी फोन केला असता त्यांना मदतीऐवजी सल्लेच मिळत असल्याची बाब समोर आली आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या प्रहार पक्षाच्या स्वप्निल पाटील यांनी या मदत कक्षात संपर्क केला असता त्यांना आम्ही काहीही करू शकत नाही असे फोनवरील अधिकाऱ्याने सांगितले गेले. तसेच रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता रुग्णालयाची असून असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याची बाब डॉक्टरांना सांगण्याचा सल्ला या कक्षातून देण्यात आला.

‘नियंत्रण कक्षातून रेमडेसिवीर कसे मिळेल हे सांगण्यापेक्षा तेथील अधिकारी आम्हाला तक्रारी करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे नातेवाईक इंजेक्शन शोधतील की तक्रारी करत बसतील,’ असा प्रश्न स्वप्निल पाटील यांनी उपस्थित केला आहे. बदलापुरातील कालिदास देशमुख यांनी नातेवाईकासाठी नियंत्रण कक्षात संपर्क केला असता सध्या तरी कोणताही साठा उपलब्ध नसल्याचे कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

काळाबाजार वाढण्याची भीती

रेमडेसिवीर सहजरीत्या उपलब्ध होण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने पावले उचलल्यानंतरही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना काळ्या बाजारातून चढय़ा दराने इंजेक्शन मिळवण्यापलीकडे पर्याय नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासकीय प्रयत्न पुन्हा तोकडे पडत असल्याचे दिसून आले आहे.