ठाण्यातील गावदेवी वाहनतळाच्या कामांमुळे धुळीचे साम्राज्य; परिसरातील रहिवाशांना श्वास घेणे कठीण

ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे गावदेवी मैदानात उभारल्या जाणाऱ्या भूमिगत वाहनतळाचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मैदानात मोठय़ा प्रमाणात खोदकाम करण्यात येत असून या खोदकामामुळे निर्माण होत असलेली धूळ परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरू लागली आहे. ही धूळ घरांतील सामानावर बसून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहेच; पण धुळीमुळे येथून ये-जा करणाऱ्यांचा श्वासही कोंडू लागला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या भागात सुसज्ज असे वाहनतळ उभारण्यासाठी पालिका प्रशासनाने गावदेवी मैदानाची निवड केली. या ठिकाणी भूमिगत वाहनतळ उभारण्याची योजना आहे. या वाहनतळाच्या उभारणीसाठी खोदकाम सुरू करण्यात येत आहे. मात्र या खोदकामातून मोठय़ा प्रमाणावर धूळ उडत असून त्यामुळे परिसरातील हवा अधिकाधिक दूषित होऊ लागली आहे.

संबंधित ठेकेदाराकडून धूळ रोखण्यासाठी ठोस उपाय आखले जात नसल्याच्या तक्रारी आसपासच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांकडून पुढे येत आहेत. असे एखादे काम करत असताना नियमित पाण्याची फवारणी करणे गरजेचे आहे. तसेच धूळरोधक यंत्रणा राबविण्याचे नियमही ठेकेदारावर बंधनकारक आहेत. मात्र या ठिकाणी अशी उपाययोजना होत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

गावदेवी मैदानाचा परिसर शहरातील अत्यंत दाटीवाटीचा मानला जातो. या मैदानाच्या भोवती मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले आणि अस्थापना कार्यालये आहेत. मैदानाचे खोदकाम सुरू झाल्यापासून या ठिकाणांच्या रहिवाशांना आणि आस्थापनांना दिवसातून दोन ते तीन वेळा साफसफाई करावी लागत आहे. तसेच गृहसंकुलांमध्ये उभ्या करण्यात येणाऱ्या चारचाकी वाहनांवरही मोठय़ा प्रमाणात धूळ जमा होत आहे. या भागातील बहुतांश संकुलांमधील घरांची तावदानेही या कामामुळे उघडी करता येत नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.

गावदेवी मैदानातील वाहनतळामुळे फायदा होणार असला तरी या वाहनतळाच्या कामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत असून घराची दिवसातून दोन वेळा साफसफाई करावी लागत आहे, असे  स्थानिक रहिवाशी सुरेश जाधव यांनी सांगितले.

गावदेवी मैदानात सध्या भूमिगत वाहनतळाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे स्थानिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली आहे. मात्र खोदकामाच्या धुळीमुळे स्थानिक नागरिकांना जर त्रास होत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी ठेकेदाराला योग्य त्या सूचना देण्यात येतील, असे   नगरसेवक   संजय वाघुले यांनी सांगितले.

शहरातील चौकातही धुळीचे साम्राज्य

शहरातील विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तीन हात नाका, नौपाडा, कोपरी, पोखरण या अधिक वर्दळीच्या आणि रहिवाशी संकुले जास्त असणाऱ्या परिसरातील हवेची गुणवत्ता खालवली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड यांच्या हवेतील गुणवत्तेच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

हवेची गुणवत्ता मर्यादा      निर्देशांक गुणवत्ता

चांगली                                ० ते २५%

मध्यम                               २६ ते ५० %

प्रदूषित                               ५१ ते ७५ %

अत्यंत प्रदूषित                    ७५% पेक्षा जास्त

 

प्रदूषणाचे चौक

ठिकाण  हवा गुणवत्ता           (टक्के)

तीन हात नाका                        १५४

नौपाडा प्रभाग                          ६४

कोपरी प्रभाग                            ३५

रेप्टाकोस कंपनी                       ३४