मुंबई महापालिकेकडून दोन दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजूर

ठाणे : भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई महापालिकेने दररोज अतिरिक्त दोन दशलक्ष लिटर पाणीपुरवठा भिवंडीसाठी मंजूर केला आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील नागरिकांना पाणीटंचाईपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भिवंडी शहराला अद्यापही ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठय़ाची गरज असल्याची माहिती भिवंडी महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून भिवंडी शहरात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. सध्या शहराला दररोज १५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असली तरी दररोज ११५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये मुंबई महापालिकेकडून ४० दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरणाकडून ७३ दशलक्ष लिटर आणि भिवंडी महापालिकेच्या स्वत:च्या प्रकल्पातून दोन दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे.

या संदर्भात नागरिकांनी महापालिका आणि येथील लोकप्रतिनिधींकडे तक्रारीही केल्या होत्या. त्यानंतर भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मुंबई आणि भिवंडी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांनी भिवंडी शहराला अतिरिक्त दोन दशलक्ष लिटर पाणीपुरवठा देण्यास मंजुरी देत असल्याचे बैठकीत सांगितले.

या भागांतील मस्या दूर

मुंबई महापालिकेने अतिरिक्त पाणीपुरवठय़ाला मंजुरी दिल्याने भिवंडीतील साईरा नगर, रामनगर, फातीमा नगर, चाविंद्र, गायत्रीनगर, ६० फूट रस्ता, नवे आझादनगर, आझादनगर, डोंगरपाडा, वकील कंपाऊंड, नुरी नगर आणि आला हजरत चौक इत्यादी भागांतील टंचाईची समस्या दूर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.