आपण आर्थिक संस्था ग्राहकांच्या सहकार्यातून चालवतो याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. कोणतीही संस्था चालवताना संस्कार हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरकार आणि सहकारापेक्षा संस्काराला अधिक महत्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

कल्याण जनता सहकारी बँकेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, खासदार कपील पाटील, बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश पटवर्धन उपस्थित होते.

अलीकडच्या काळात बँक उघडणे म्हणजे दोन्ही हातांनी ग्राहकांना लुटणे, असे समजले जाते. मुंबईतील एका सहकारी बँकेत अलीकडे झालेल्या प्रकारानंतर तर आर्थिक संस्थाबद्दल समाजात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे आर्थिक संस्था, समाजाच्या दृष्टीने खूप मारक आहे, असे मत राज्यपालांनी या वेळी व्यक्त केले.

सरकारी किंवा खासगी सहकारी संस्था असोत, भ्रष्टाचाराच्या वाळवीने देशाला पोखरून काढले आहे. अशा परिस्थितीत कल्याण जनता सहकारी बँकेने आपली आर्थिक शिस्त कायम ठेऊन ग्राहकांचा जो विश्वास संपादन केला आहे तो कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्रात सहकार क्षेत्राला वेगळे स्थान आहे. सहकाराच्या माध्यमातून विविध कामे राज्याच्या विविध भागात उभी राहिली आहेत. पर्यावरण संवर्धनाबरोबर समाज विकासाची कामे सामाजिक दायित्व निधीतून केली पाहिजेत. यामधून समाजाला एक दिशा मिळते. सामाजिक दायित्व निधीचा सदुपयोग केला तर चांगल्या संस्था, व्यक्ती संस्थेशी जोडल्या जातात, त्यामधून विकासाची अनेक कामे उभी राहतात. यामधून होणारा विकास आदर्शवत असतो, असे राज्यपालांनी सांगितले.

हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी, कृष्णलाल धवन आणि महेश अग्रवाल यांना संचालक समाजसेवा पुरस्कार देऊन या कार्यक्रमात गौरविण्यात आले. त्यांनी पुरस्काराची रक्कम बँकेला सुपूर्द केली.

या वेळी बँकेचे उपाध्यक्ष मधुसूदन पाटील, पुरस्कार निधीचे लक्ष्मीकांत उपाध्याय, मोहन आघारकर, निशिकांत बुधकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर उपस्थित होते.