अवैध खासगी बस गाडय़ांकडे प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

ठाणे : रस्ते, मेट्रो आणि पुलांची बांधकामे यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ठाणे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकले असताना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस गाडय़ा कोंडीत भर घालत आहेत. कोंडीस कारण ठरणाऱ्या खासगी बसचालकांवर प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलीस विभाग कारवाई का करीत नाही, असा संतप्त प्रश्न नागरिक करत आहेत.

ठाण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नसल्याने खासगी बसचालकांचे फावले आहे. अवैध खासगी प्रवासी बस गाडय़ा दिवसागणिक वाढत आहेत. हे वाढते प्रमाण आणि चालकांकडून सर्रास केला जात असलेला नियमभंग यामुळे रस्त्यावरील वाहतुकीत अडथळे येत आहेत. वाहतूक पोलीस मात्र या नियमभंगाकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

पूर्वेतील कोपरी भागातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस गाडय़ांचे प्रमाण अधिक आहे. नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात नवनवी संकुले निर्माण झाल्याने तिथून ठाणे स्थानकाच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या मार्गावर परिवहन बस गाडय़ा कमी असून रिक्षाचालकही १०० ते २०० रुपये भाडे आकारतात. याचा फायदा घेत खासगी बसचालक ठाणे पूर्व ते घोडबंदर या मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करतात. कंपनीतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी असलेल्या या खासगी बस गाडय़ा नियोजित ठिकाणी परतताना कोपरीतून अवैधपणे प्रवासी वाहतूक करतात. सकाळी आणि सायंकाळी कोपरी भागातून अवैध वाहतूक करणाऱ्या खासगी बस गाडय़ांचे प्रमाण हे ८०हून अधिक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कोपरीतील वाहतूक पोलीस चौकीसमोरूनच खुलेआम ही अवैध वाहतूक सुरू असते. वाहतूक पोलीस मूग गिळून गप्प बसलेले दिसतात. ठाणे पूर्व रेल्वे स्थानक ते कासारवडवली या मार्गावर बेकायदा धावणाऱ्या खासगी बस गाडय़ांचे परवाने रद्द करण्याचे कोणतेही अधिकार नसल्यामुळे वाहतूक पोलीस केवळ दंडात्मक कारवाई करीत आहेत. मात्र तरीही गोरखधंदा सुरूच आहे.

नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर मार्गावरही अवैध वाहतूक मोठय़ा प्रमाणावर सुरू असते. सध्या महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण रस्ते आणि मेट्रोची कामे करीत आहेत. त्यामुळे अरुंद झालेल्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून या कोंडीत खासगी बस गाडय़ांची भर पडत आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात पुरेशा बसगाडय़ा नाहीत. त्यामुळे प्रवासी खासगी बस वाहतुकीकडे वळले आहेत.

खासगी वाहतुकीचे दर

चौकट                                       रक्कम

कोपरी ते नितीन जंक्शन-             ८ रुपये

कोपरी ते माजिवाडा-                   १० रुपये

कोपरी ते कापुरबावडी-               १० रुपये

कोपरी ते मानपाडा-                   १२ रुपये

कोपरी ते कासारवडवली-           १५ रुपये

उड्डाणपुलावरून धोकादायक प्रवास

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस गाडय़ांचे वाहनचालक प्रवाशांना उतरवताना सुरक्षित बाजूला वाहन थांबवण्याऐवजी रस्त्याच्या मधोमध वाहन थांबवतात, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. ठाणे आणि घोडबंदर भागातील महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलांवरून खासगी बसगाडय़ा प्रवासी वाहतूक करतात. उड्डाणपुलांच्या पायथ्याशी बस गाडय़ा थांबवण्यात येतात आणि तिथेच प्रवाशांची चढ-उतार सुरू असे. त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस गाडय़ांवर प्रादेशिक परिवहन विभागाचे योग्य लक्ष आहे. जास्तीत जास्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

– श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे