पुलाला धोका नसल्याने वाहतूक सुरळीत

मुंबई-नाशिक महामार्गावरील अवघ्या दोन वर्षांपूर्वी डागडुजी करण्यात आलेल्या साकेत खाडीपुलाच्या मार्गिकेला तडे गेल्याचे सोमवारी अघड झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी या ठिकाणची वाहतूक काही प्रमाणात नियंत्रित केली. मात्र पुलाच्या संरचनेला धोका नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांच्या पाहणीत उघड झाले आहे. त्यामुळे तडे गेलेल्या मार्गिकेची तात्पुरती दुरुस्ती करून या पुलावरील वाहतूक सुरूच ठेवण्यात आली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर ठाण्यातील साकेत भागात खाडी पूल आहे. या पुलाच्या नाशिक-मुंबईच्या दिशेला असलेल्या मार्गिकेच्या टोकाजवळील सांध्याशेजारी तडे गेले आहेत. काही वाहनचालकांनी सोमवारी सकाळी माहिती देताच कळवा वाहतूक पोलिसांनी पुलाची पाहणी केली. तसेच संभाव्य धोका पाहून या ठिकाणी मार्गरोधक उभे करण्यात आले. साकेत खाडीपुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन मार्गिका आहेत. त्यापैकी नाशिक-मुंबई मार्गिकेवर मार्गरोधक उभे करण्यात आल्यामुळे वाहतुकीसाठी एकच मार्गिका उपलब्ध होती.

त्यामुळे या मार्गावरून संथगतीने वाहतूक सुरू होती. तसेच या मार्गिकेवरून जाणारी अवजड वाहतूक माणकोली भागातून भिवंडी मार्गे वळविण्यात आली. तर मुंबई-नाशिक मार्गिकेवरील वाहतुकीत मात्र कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू होती.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी पुलाची पाहणी करून तो वाहतूकीसाठी धोकादायक नसल्याचे स्पष्ट केले. तडा गेलेला भाग स्टील प्लेट टाकून बुजविण्यात येणार आहे. चार ते पाच तासांत हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याचे अभियंत्यांकडून सांगण्यात आले आहे. पुलाच्या खालच्या बाजूने हे काम करण्यात येणार असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी दिली.

दोन वर्षांपूर्वी डागडुजी

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाचे बांधकाम १९८२ मध्ये करण्यात आले होते. सहा सांध्यांमध्ये जोडणी करून या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी सांध्यातील जोडणीचा भाग उंच-सखल झाल्यामुळे पुल नादुरुस्त झाला होता. तसेच डांबरीकरणामुळे पुलावर डांबराचे थर वाढले होते. या डांबराचा भारही पुलावर वाढला होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी पूल वाहतूकीसाठी बंद करून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते.