जिल्हा नोंदणी कार्यालयाला १३ कोटींचा महसूल

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : टाळेबंदीच्या काळातही ठाणे जिल्ह्य़ात ३३६ नवी घरे विकली गेली असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घरांच्या नोंदणीमुळे ठाणे जिल्हा नोंदणी कार्यालयाला मे महिन्याच्या १९ दिवसांमध्ये १३ कोटी ८१ लाखांचा महसूल मिळाला आहे.

मुंबई शहराच्या तुलनेत जिल्ह्य़ातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर शहरांत कमी दराने घरे उपलब्ध आहेत. त्यामुळे नव्या घरांच्या गुंतवणुकीसाठी अनेक जण ठाणे जिल्ह्य़ाला प्राधान्य देतात. २२ मार्चपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्याने नव्या घरांच्या खरेदी-विक्रीसह नोंदणीची कामे पूर्ण ठप्प झाली होती. ही कामे पुन्हा सुरू करण्यासाठी ठाणे जिल्हा नोंदणी कार्यालयाने ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर आणि कोकणभवन या चार कार्यालयांचे कामकाज प्रायोगिक तत्त्वावर १३ ते १५ मे दरम्यान सुरू केले होते. या तीनच दिवसांत १६८ नव्या घरांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये ठाण्यात ११४, नवी मुंबई १८, मीरा-भाईंदर २२ आणि कल्याण तालुक्यातील ५ घरांचा समावेश होता. १३ मे ते ३१ मे या १९ दिवसांच्या कालावधीत एकूण ३३६ घरांची नोंदणी झाली.

जून महिन्यात १०० कोटींचा महसूल?

गेल्या दोन महिन्यांपासून नव्या घरांच्या खरेदी विक्रीची रखडलेली कामे जून महिन्यात मार्गी लागणार असून यामाध्यमातून जिल्हा नोंदणी कार्यालयाला १०० कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.