खाडीतील रेती काढण्यासाठी ऑनलाइन लिलाव; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी व कल्याण या तालुक्यांतील खाडीमधील यांत्रिक साधनांद्वारे रेती उत्खननासाठी राखीव असलेल्या जागांवरून रेती काढण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने लिलाव करण्यात येणार आहे.

या लिलावासंदर्भातील माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून तेथून याविषयाची माहिती घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. त्यामुळे ठाण्यातील रेती उत्खननासाठी राखीव भागातून पुढील महिन्यात रेती काढण्यास सुरुवात होऊ शकणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील खाडीतून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत रेती उपसा होत असून त्याबरोबरीने आता अधिकृत रेती उपसा करण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. https://eauctioncolltha.abcprocure या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेची माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून नोंदणी प्रक्रियेपासून लिलाव प्रक्रियेपर्यंतची माहिती यावरून देण्यात येणार आहे.लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकी रेती उपगटासाठी प्रपत्रामध्ये नमूद करण्यात आलेली रक्कम अनामत असून ती ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यशाळा आयोजित करून ही प्रक्रिया इच्छुकांना समजावून दिली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण खाडीमध्ये अधिकृतपणे रेती उपसा सुरू होणार आहे.