जिल्हाधिकारी कल्याणकरांची बदली होताच पुन्हा वाळूउपसा

ठाणे जिल्ह्यतील मुंब्रा, डोंबिवली, कोपर, कल्याण, उंबर्डे, भिवंडी, कोन, अंजुरदिवे परिसरातील वाळू तस्करांच्या अड्डय़ांना काही प्रमाणात लगाम घालणारे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची बदली होताच मंगळवारपासून पुन्हा एकदा बेकायदा वाळू उपशाला सुरुवात झाली आहे.

मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी परिसरात सुमारे ५० ते ६० बोटी (सेक्शन पंप) खाडीत रेती उपसा करण्यासाठी वाळूतस्करांनी नांगरून ठेवल्या असल्याचे माहितीगार सूत्रांनी सांगितले. मुंब्रा खाडीवरील रेल्वे पुलालगतच्या भागात खारफुटी, रानटी झाडे तोडून वाळूतस्कर रात्रंदिवस वाळूउपसा करीत आहेत. अशीच परिस्थिती डोंबिवली जवळील कोपर, मोठागाव, दुर्गाडी, कोन, पिंपळास, माणकोली, अंजुरदिवे, देवीचा पाडा, उंबर्डे, सापाड, नवापाडा भागात आहे. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या आदेशावरून ठाणे, भिवंडी, कल्याणचे प्रांत अधिकारी प्रसाद उकर्डे, तहसीलदार अमित सानप, नायब तहसीलदार अभिजीत खोले, तलाठी प्रशांत शिंदे, सुभाष रसाळ, मंडळ अधिकारी राजेंद्रकुमार पिसे यांच्या पथकाने गेल्या दोन वर्षांत तस्करांचे सेक्शन पंप (वाळू उपसा यंत्र) मोडतोड करून खाडीत बुडविले. वाळू उपशाच्या काही बोटी सील करून खाडीकिनारी लावून ठेवल्या होत्या. महसूल अधिकाऱ्यांच्या नकळत तस्करांनी या बोटी दुरुस्त करून खाडीकिनारी सुस्थितीत ठेवल्या.

गेल्या तीन वर्षांत २०० ते ३०० हून अधिक वाळूमाफियांवर महसूल विभागाने फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. डोंबिवली मोठागाव खाडीकिनारी चोरीची वाळू साठवणूक करण्यासाठी हौद बांधणारा शिवसेनेचा एक ज्येष्ठ नगरसेवक-नगरसेविकेवरही महसूल विभागाने गुन्हे दाखल केले होते. या काळात मुंब्रा ते कल्याणपर्यंतचा खाडीकिनारा मोकळा श्वास घेत होता. खाडीकिनारे तस्करांपासून मुक्त करून तेथे पुन्हा त्यांना तळ ठोकता येऊ नये म्हणून उद्यान, मनोरंजन नगरी, पर्यावरण उद्यान उभारणीसाठी महसूल विभागाने विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, कल्याणकर यांच्या बदलीचे आदेश निघताच दोन दिवसांपासून वाळूतस्करांनी पुन्हा एकदा उपसा सुरू केला आहे. नवे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर या तस्करांचा बीमोड कसा करतात याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.