ठाणे रेल्वे स्थानक परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त व्हावा यासाठी कोटय़वधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पाच्या (सॅटीस) उपयुक्ततेबाबत मतमतांतरे असतानाच आता असाच प्रकल्प कळवा रेल्वे स्थानक परिसरातही उभारण्यात येत आहे. कळवा स्थानक परिसरातून नागरी वस्तीच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना होणारा मनस्ताप दूर करून कळवा स्थानकाच्या नियोजनपूर्वक विकासासाठी ‘सॅटीस’सारखा प्रकल्प उभारण्यासाठी मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून चाचपणी सुरू आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे ठाणे महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
 ठाणे शहराचे दुसरे टोक असलेल्या कळव्यात लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, येथील नागरिकांना उपलब्ध असलेल्या वाहतूक सुविधा अत्यल्प आहेत. स्थानकाला लागूनच असलेल्या रेल्वे कारशेडमुळे नागरी वस्ती गाठण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते.      
स्थानकाच्या दिशेने येणारी पायवाटही अतिशय अरुंद आहे. शिवाय मनीषा नगर, खारेगाव परिसरातून स्थानकापर्यंत जाणारी थेट परिवहन सेवा उपलब्ध नसल्याने कळव्यातून प्रवास करणे तापदायक बनले आहे. त्यामुळे कळव्यातील बहुतांश रहिवासी रेल्वे प्रवासासाठी ठाणे स्थानकाची वाट धरताना दिसतात. विटावा परिसरातून रेल्वे मार्गातून वाट काढत ठाणे स्थानक गाठणाऱ्या प्रवाशांचा आकडाही मोठा आहे.
या प्रवाशांसाठी स्कॉयवॉक उभारण्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर कळवा स्थानक परिसराचे योग्य नियोजन व्हावे तसेच रेल्वेच्या अखत्यारीत असलेली जागा उपयोगात आणता यावी, यासाठी सॅटीस प्रकल्पाचा विचार सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. या प्रकल्पाची आखणी कशी असावी तसेच त्यासाठी येणारा खर्च किती असेल, याविषयीचा अभ्यास सुरू आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
जयेश सामंत, ठाणे

सॅटीसऐवजी चार पदरी रस्ता द्या!
‘ठाण्याच्या धर्तीवर कळवा स्थानकात सॅटीससारखा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय पक्का झाला असेल तर त्याचे स्वागतच आहे, मात्र येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता सॅटीससारखा पांढरा हत्ती पोसण्याऐवजी सह्य़ाद्री शाळेपासून रेल्वे स्थानकापर्यंत चार पदरी रस्त्याचे काम आधी करणे गरजेचे आहे,’ असे मत कळव्याचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेला कळविले आहे. या भागात मुळात रेल्वेची फारशी जागा नाही. असे असताना सॅटीससारख्या प्रकल्पावर कोटय़वधीचा खर्च करण्याऐवजी येथे सद्य:स्थितीत असलेला नाला आणि काँक्रिट रस्त्याची देखभाल दुरुस्ती योग्य प्रकारे होण्याची गरज आहे. याशिवाय चार पदरी रस्ता उभा राहिल्यास सॅटीसची गरज भासेल असे वाटत नाही, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.

कळवावासीयांच्या कळा..
* स्थानकाबाहेरील कारशेडमुळे नागरी वस्तीला जाण्यासाठी मोठी पायपीट.
*  स्थानक परिसरात वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची मनमानी.
* मनीषा नगर परिसरातून स्थानकात येणाऱ्या अरुंद रस्त्यावरही खड्डय़ांचे साम्राज्य.
* सुशोभीकरणासाठी मोकळ्या करण्यात आलेल्या स्थानक परिसरात फेरीवाल्यांचे ठाण.
*रात्रीच्या वेळी महिलांवर हल्ले, चोरीचे प्रकार.