ठाणे जिल्ह्यातील नव्या जलस्रोतांचा शोध सुरू

अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, आटत चाललेला पाणीसाठा यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरांतील पाणीप्रश्न बिकट होत चालला आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी पाणीपुरवठा आढावा बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील नवे जलस्रोत शोधण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. मात्र, २००५ मध्ये चितळे समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालात अशीच शिफारस करण्यात आली असताना गेल्या ११ वर्षांत एकही नवीन जलस्रोत निर्माण करण्यात यंत्रणांना अपयश आले असताना, ऐन दुष्काळात हे काम कसे पूर्ण होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीचे बारवी धरण आणि टाटा वीज प्रकल्पाच्या आंद्र धरणामुळे बारमाही वाहणारी उल्हास नदी या अवघ्या दोनच जलस्रोतांद्वारे सध्या ठाणे जिल्ह्य़ास पाणीपुरवठा केला जातो. मुंबईतील घरांच्या किमती परवडणाऱ्या नसल्याने गेल्या दहा-बारा वर्षांत ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागाची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. नवे नवे टॉवर्स, संकुले उभारले जात आहेत. मात्र त्यासाठी पाणी कुठून आणणार, हा प्रश्न आहे.

आहे ते पाणी काटकसरीने वापरा, पाण्याचा पुनर्वापर करा, विहिरी, कूपनलिका दुरुस्त करून उपलब्ध होणाऱ्या भूजलाचा वापर करा, आदी सूचना मंगळवारी नियोजन भवनात झालेल्या विविध प्राधिकरण तसेच लोकप्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आल्या. त्याचबरोबर खास ठाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या काळू आणि शाई प्रकल्पांचा नव्याने आढावा घेण्याचे संकेतही जलसंपदामंत्र्यांनी दिले.

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, पर्यावरणीय प्रश्न आदी कारणांमुळे ठाण्यासाठी प्रस्तावित असलेले शहापूर तालुक्यातील शाई आणि मुरबाडमधील काळू हे धरण प्रकल्प मार्गी लागू शकले नाहीत. बारवी विस्तारीकरण योजना गेली दहा वर्षे पुनर्वसनाच्या प्रश्नावरून रखडली आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावून हे विस्तारीकरण युद्धपातळीवर मार्गी लावण्याचे आदेश जलसंपदामंत्र्यांनी बैठकीत दिले. लवकरच मंत्रालयात बैठक बोलावून ठाणे जिल्ह्य़ातील नव्या जलस्रोतांबाबत निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी जाहीर केले.

गळती आणि नवी बांधकामे रोखा

अपुऱ्या साठय़ामुळे सध्या सर्वत्र ३० ते ४० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असली तरी शहरातील सदोष वितरण व्यवस्थेमुळे तितकेच पाणीगळतीमुळे वाया जात आहे. त्यामुळे संबंधित प्राधिकरणांनी तातडीने गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले.  तसेच शहरांमध्ये नव्याने बांधकामांना परवानग्या देऊ नयेत, अशी सूचना आमदार किसन कथोरे यांनी आढावा बैठकीत केली.

छोटय़ा जलस्रोतांचे शोध

अंबरनाथ शहरातील चिखलोली धरणातून सध्या दररोज सात दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. या धरणाची उंची अडीच मीटरने वाढवली तर त्यातून आणखी अतिरिक्त सहा दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होणार आहे. बदलापूरजवळील भोज धरणातून बदलापूर शहरासाठी सहा दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा करण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. बदलापूर शहरालगत असलेले इंदगाव, चिंचवली येथील जलस्रोतांवर छोटे बंधारे बांधले तर काही दशलक्ष लिटर्स पाणी त्यातून उपलब्ध होऊ शकेल.