१ डिसेंबपर्यंत कोणत्याही नागरी प्रश्नावर आंदोलन अथवा घेरावासाठी मज्जाव

केंद्र सरकारने जाहीर केलल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली असताना येत्या १ डिसेंबपर्यंत कोणत्याही नागरी प्रश्नावर आंदोलन अथवा घेराव करण्यास ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे. यासंबंधीचा मनाई आदेश काढण्यात आला असून पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येऊन कोणतेही निदर्शन अथवा घेराव करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश नियमित स्वरूपाचा असल्याचा दावा पोलीस विभागामार्फत केला जात असला तरी नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर जनसामान्यांमध्ये असलेल्या रोषाची किनार त्याला असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

[jwplayer OnydZc5l]

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटाबंदीमुळे देशभरात चलनकल्लोळ सुरू झाल्याचे चित्र दिसत असून बँका तसेच एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागलेल्या रांगा सलग दोन आठवडय़ांनंतरही कायम आहेत. या काळात रांगेत उभ्या असलेल्या काही व्यक्तींना प्राणांना मुकावे लागले असले तरी ठाणे जिल्ह्य़ात एखाददुसरा अपवाद वगळला तर कोठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. मध्यंतरी मुंब्रा परिसरात काही बँकांमध्ये पैसे संपल्याने रांगेत तासन्तास उभ्या असलेल्या ग्राहकांच्या सहनशक्तीचा कडेलोट होण्याची चिन्हे होती. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संतापलेल्या ग्राहकांना वेळीच शांत करण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी येत्या १ डिसेंबरपर्यत संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मनाई आदेश जाहीर केला असून त्यानुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून महागाई, वीज भारनियमन, पाणीटंचाई व जनतेच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, निदर्शने, घेराव, धरणे, सभा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, नोटाबंदीच्या काळातही कृषिमालाचे दर आटोक्यात असून थंडीचा हंगाम असल्याने भारनियमनाचा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच जिल्ह्य़ात कोणत्याही शहरात सद्य:स्थितीत पाणीकपात अथवा टंचाईसदृश परिस्थिती नाही. असे असताना या मुद्दय़ावरून आंदोलन होऊ शकते, असा कयास बांधत पोलिसांनी जाहीर केलेल्या जमावबंदीमागील नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जमावबंदीचा आदेश लागू करत असताना पोलिसांनी कुठेही नोटाबंदी तसेच बँकांबाहेर लागणाऱ्या रांगांचा उल्लेख केलेला नाही. असे असले तरी अचानक काढण्यात आलेल्या या आदेशामागे हे एक कारण असू शकते, असा तर्क लढविला जात असून वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र याविषयी ठोस माहिती देत नसल्याचे चित्र आहे. सदर मनाई आदेश हा आदेश १७ नोव्हेंबर सकाळी १० वाजल्यापासून ते १ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत अमलात राहील, असे ठाण्याचे प्रभारी पोलीस आयुक्त बिपीन बिहारी यांनी कळविले आहे. दरम्यान, अशा स्वरूपाचे आदेश नियमित निघत असतात, अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली. नोटाबंदीमुळे हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे का, या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.

आदेश नियमित स्वरूपाचा

जमावबंदी तसेच मनाई आदेश लागू करत असताना ठाणे पोलिसांनी लग्नकार्य, प्रेतयात्रा, कोर्टकचेऱ्या येथे जमणारे नागरिक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमणाऱ्या जनसमुदाय तसेच पोलीस आयुक्त किंवा त्यांनी परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुकांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. त्यामुळेच हा आदेश नियमित स्वरूपाचा असल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

[jwplayer 1yLms27W]