गे ल्या काही वर्षांत काय केले याचा लेखाजोखा मांडण्यासारखे सत्ताधारी शिवसेना, भाजपजवळ फारसे काही नाही, असेच चित्र आहे. ‘करून दाखवले’चा एकही आदर्श प्रकल्प सामान्यांना दाखवण्यासाठी यांच्यासमोर नाही. आता हे जाहीरनामे, वचननाम्यांची भेंडोळी करून ती लोकांपुढे मांडायला पुन्हा सज्ज झाले आहेत. भावनिक मुद्दे, हिंदुत्ववाद, कुरघोडी करणारे विषय उकरून काढले जात आहेत. या रंगेलपणात समाज, जात, पंथ, गट-तटातील ही नगरी न्हाऊन निघणार आहे. कल्याण-डोंबिवलीत विकासाच्या नावाने मागील २० वर्षांत फक्त गप्पा आणि घोषणा झाल्या. प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य आहे. शहरे उजाड आणि बकाल झाली आहेत. महापालिका निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मागील साडे सतरा वर्षे महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. उर्वरित अडीच वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्रहामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना कल्याणमधील काळा तलाव आणि डोंबिवलीत बालभवनसारखे प्रकल्प मिळाले. वयोमानानुसार शिवसेनाप्रमुखांचे या शहरांवरील लक्ष कमी झाले. त्यांचा वारसा चिरंजीवांकडून पुढे नेला जाईल असे सामान्यांना वाटले होते. परंतु पक्षप्रमुखांनी या शहराकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही.

महापालिका निवडणुका आल्या की त्या अगोदर एक ते दोन महिने शहरात घिरटय़ा घालायच्या. तोडकीमोडकी कामे करून घ्यायची. एवढेच उद्योग शिवसेनेच्या सेनापतींकडून काही वर्षे सुरू आहेत. या सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी बाकावरील काँग्रेस, राष्ट्रवादीने खूप काही शहर विकासासाठी दिवे लावले असेही नाही. मागील पाच वर्षांपासून महापालिकेत असलेली मनसेही याच पक्षांच्या दावणीला बांधली गेली. आता पालिकेतील सत्तेच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी सगळ्या पक्षांमधील नेते शहरात दाखल झाले आहेत. महत्त्वाचे विकास प्रकल्प रखडून सत्ताधारी शिवसेना-भाजपने कल्याण-डोंबिवलीचा इतका विचका करून ठेवला आहे की विकासाची जाहिरात ही मंडळी कोणत्या आधारावर करत आहेत असा प्रश्न पडावा. सत्ताधारी म्हणून शिवसेनेने दीड महिन्यापूर्वी कारंजे, तलावाच्या सुशोभीकरणाचे समारंभ उरकले. काही शाळांमध्ये टॅबचे वाटप केले. कारंजांच्या रंगीत धारा पाहून लोकांचे डोळे दिपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कचरा, क्षेपणभूमी, प्रदूषण, सीमेंट रस्ते, उड्डाण पूल, वाहतूक कोंडी या महत्त्वाच्या विषयावर बोलायला यांना आता सवड नाही असे चित्र आहे.
विकासाची थट्टा
पाच वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपने विकासाचा जाहीरनामा प्रकाशित केला होता. जाहीरनाम्यात विकासाची ८५ आश्वासने दिली होती. त्यापैकी फक्त १२ आश्वासने पूर्ण करण्यात या सत्तेला यश आले. आज मात्र आम्ही ८५ टक्के पूर्ण केल्याचा दावा करीत आहेत. कामे पण कोणती पूर्ण केली. तर, कारंजे, अर्धवट स्थितीतील वाचनालय, पालिकेने रखडून ठेवल्यामुळे गंजलेला तरण तलाव. अशा फुटकळ विकास प्रकल्पांचे उद्घाटन करून खूप काही केल्याचा देखावा निवडणुकीच्या तोंडावर उभा करण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांपूर्वी जनतेला ‘फक्त पालिकेतील सत्ता द्या. पाहा, कसा शहराचा कायापालट करून दाखवतो. सत्ता मिळताच शहरात पहिल्यांदा तारांगण, मत्स्यालय, भावे स्मारकाच्या निर्मितीला सुरुवात करतो’ असे आश्वासन दिले होते. याशिवाय जनतेला २४ तास पाणी, उड्डाण पूल, कचरामुक्त, प्रदूषण मुक्त शहरे, सिंगापुरी रस्त्यांसारखे सीमेंट रस्ते असा भव्यदिव्य देखावा शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी त्यावेळी प्रचाराच्या व्यासपीठावर उभा केला होता. पाच वर्षांत २४ तास पाणी नाही, पण ज्या विभागात शिवसेनेच्या महापौर राहत आहेत, तोच कल्याण पूर्व विभाग मागील पाच वर्षे पाणीटंचाईचा त्रास सहन करत आहे.
आघाडीचे दिवे
जे शिवसेना-भाजपने केले तेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे. आघाडीच्या नेत्यांनी पाच वर्षांपूर्वी १३५ आश्वासने जनतेला जाहीरनाम्यांतून दिली होती. त्यापैकी १० आश्वासने पूर्ण करण्यात आघाडीला यश आले. राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही आघाडीचे नगरसेवक सरकारमधील विकास कामांचे लाभ पालिकेला मिळू शकले नाहीत. बारवी धरणातील नवी मुंबईच्या वाटय़ाचे पाणी कल्याण-डोंबिवली पालिकेला मिळावे म्हणून मागील सात वर्षांपासून युती, आघाडीचे नगरसेवक प्रयत्नशील आहेत.
आघाडी सरकारने हा विषय माजी मंत्री गणेश नाईक यांच्या दबावामुळे बासनात ठेवला. आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी या शहरात येऊन जनतेला विकासाची गाजरे दाखवली. याच पक्षाच्या एका नगरसेवकाचे बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेवकपद रद्द झाले आहे.
नवनिर्माणाची दवंडी
मनसेच्या प्रमुखांनी पाच वर्षांपूर्वी एक हाती सत्ता द्या आणि पाहा कसा चाबूक चालवून शहराचा कायापालट करून दाखवतो, असे चित्र जनतेसमोर उभे केले होते. जनतेने मनसेला सत्तेच्या कोपऱ्यापर्यंत म्हणजे विरोधी पक्षांपर्यंत नेऊन ठेवले होते. विरोधी पक्षाची खुर्ची मनसेला चार वर्षांहून अधिक काळ मिळाली. या कालावधीत मनसेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी जनतेशी बांधीलकी ठेवून प्रामाणिकपणे विकासाच्या वाटेवर राहून प्रभागांमध्ये, शहरातील विकास कामांवर नजर ठेवली असती तर विरोधी बाकावर बसूनही काही चांगल्या नागरी सुविधा जनतेच्या वाटय़ाला येऊ शकल्या असत्या. पण सत्ताधाऱ्यांपुढे मनसेने नेहमीच नमते घेतले. हे नेते असे वागले नसते तर विकासाची कोटय़वधी रुपयांची कामे सत्ताधाऱ्यांच्या सहमतीशिवाय प्रभागात आणि पदरात पाडून घेता आली नसती. ही धाकधूक मनसे नगरसेवकांच्या मनात कायम राहिली. त्यामुळे सभागृहात मनसेचे नगरसेवक फारसे आक्रमक होताना कधी दिसलेच नाही. याच मुद्दय़ावर खुलासा करताना आता मनसे पक्षप्रमुख, नेत्यांची दमछाक होत आहे.