प्रचारात मनसेचीही उडी;  शिवसेनेचे प्रत्युत्तर

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची लढाई रंगली असतानाच त्यापाठोपाठ आता या तिन्ही पक्षांमध्ये फलकयुद्ध सुरू झाले आहे. या प्रचारयुद्धात आता मनसेनेही उडी घेतली असून या चारही पक्षांनी शहरातील चौकाचौकांमध्ये मोठे फलक लावले आहेत. या फलकाच्या माध्यमातून राष्ट्रवादी, भाजप आणि मनसेने अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे, तर शिवसेनेने मात्र २५ वर्षे विकासाची आणि विश्वासाची अशा आशयाचे फलक लावत दोन्ही पक्षांना प्रत्युत्तर दिले आहे.

निवडणूक २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरात राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची लढाई सुरू झाली आहे. गेली २५ वर्षे ठाणे महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या कारभारावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. तसेच वचननाम्याच्या मुद्दय़ावरून शिवसेनेवर आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी आव्हाडांच्या आरोपांना प्रतिउत्तर देत त्यांच्यावर आरोप केले होते. राज्यात युती तुटल्यानंतर भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख टाळत त्यांच्यावर ‘दाढीवाले बुवा’ अशी टीका केली होती. त्यावर भाजपमध्ये ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यापासून ते मोदी यांच्यापर्यंत अनेकांना दाढी असल्याचे शिंदे म्हणाले होते.

शिवसेना एकाकी

ठाणे शहरातील चौकाचौकांमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मोठे फलक लावले असून त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने फलकांमधून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ‘गेली २५ वर्षे सत्तेची.. २५ वर्षे नाकर्तेपणाची..’ अशा आशयाचे फलक राष्ट्रवादीने लावले आहेत. तसेच ‘आता तरी विचार कर ठाणेकर’ अशी साद मतदारांना घातली आहे. ‘राजकारण नाही भ्रष्टाचाराचे कुरण, न खाऊंगा न खाने दूंगा, हेच भाजपचे धोरण’ अशा आशयाचे फलक भाजपने लावत शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ‘मला भ्रष्टाचाराचा मार्ग मान्य नाही, जे गेले त्यांना माझा मार्ग जमला नाही’ अशा प्रकारचे फलक मनसेने लावले आहेत. तर ‘गेली २५ वर्षे विकासाची आणि विश्वासाची’, असे फलक शिवसेनेने लावले आहेत.