ठाणे शहरात करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढू लागला असताना शहरातील गृहनिर्माण संस्थांनीच यापुढे संकुलांमधील क्लब हाऊस, बहुउद्देशीय सभागृहात अलगीकरण केंद्र तयार करावे असा अजब आदेश काढत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी

सोसायटय़ांमधील पदाधिकारी आणि रहिवाशांना ‘आत्मनिर्भर’ होण्याचा मार्ग दाखवून दिला.

कोणतीही लक्षणे नसलेल्या करोनाबाधितांना या संकुलात दाखल केले जावे. तसेच तेथील सफाई या ‘होकारात्मक’ ठरलेल्या रुग्णांनीच करावी. या रुग्णांची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टरचे मानधन रुग्ण अथवा सोसायटीने द्यावे तसेच क्लब हाऊसमध्ये ऑक्सिजन सिंलेंडरची व्यवस्था करावी, अशी अनेक बंधने गृहनिर्माण संस्थांवर टाकण्यात आली आहेत. वसाहतींमधील या अलगीकरण केंद्रात रुग्णांना चहा, नाश्ता आणि भोजन पुरविण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांवर तर सेंटरची साफसफाई, बायोमेडिकल कचरा, गृहसंकुलातील डॉक्टरांची नेमणूक करणे, अशी जबाबदारी पदाधिकाऱ्यांच्या माथी मारण्यात आली आहे.

गृहसंकुलात डॉक्टर उपलब्ध नसतील तर महापालिकेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या डॉक्टरांचे मानधन देण्याची जबाबदारी रुग्ण, त्याचे कुटुंब आणि गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या निर्णयास ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनने कडाडून विरोध केला आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिस्तरीय वैद्यकीय आस्थापना निर्माण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या आदेशाचा आधार घेत शहरातील गृहसंकुलांमधील क्लब हाऊस, बहुउद्देशीय सभागृह कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्याचे लेखी आदेश आयुक्तांनी काढले आहेत. या आदेशातील सर्व शर्ती मान्य असल्याबाबत आणि कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत लेखी सहमतीचे पत्र संबंधित गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी परिपत्रक प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत ठाणे महापालिकेला लेखी कळवावे, असे बंधन करण्यात आले आहे.

अटी आणि शर्ती

* क्लब हाऊ स आणि बहुउद्देशीय सभागृहांमध्ये संबंधित गृहसंकुलातील सदस्यांना अलगीकरण करण्यात येणार आहे.

* सदस्यांच्या गृहसंकुलाबाहेरील नातेवाईकांना सेंटर आणि बाहेरील व्यक्तींना सेंटरमध्ये आणता येणार नाही.

* कोविड सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सदस्यांची मागणी निर्माण झाल्यास प्रथम आलेल्या सदस्याला विलगीकरण केले जाणार आहे.

गृहसंकुलांकडे अशा प्रकारच्या खर्चासाठी वेगळी तरतूद नसल्यामुळे गृहसंकुलांना रुग्णाच्या खर्चाची जबाबदारी उचलणे शक्य होणार नाही. जी गृहसंकुले स्वेच्छेने करण्यास तयार असतील त्यांच्या सेंटरसाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांना वैद्यकीय ज्ञान नसते. त्यामुळे एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली आणि त्याला उपचार मिळाले नाहीत तर त्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे अशा प्रकारची जबाबदारी गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांवर देणे चुकीचे असून या निर्णयास आमचा विरोध आहे.

-सीताराम राणे, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन