राजाजी रस्त्यावरील कोंडी सुटणार; दोन कोटी १९ लाख वाढीव खर्चाला मंजुरी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील राजाजी रस्त्यावरील कोपर उड्डाण पुलाला सेवा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.  या वाढीव कामासाठी दोन कोटी १९ लाखाच्या खर्चाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. नव्या आराखडय़ाप्रमाणे बांधण्यात येणाऱ्या या पुलामुळे राजाजी रस्त्यावरील वाहतूक, पादचारी कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

राजाजी रस्त्यावरील हा कोंडीचा प्रश्न कायमचा संपविण्यासाठी महापालिकेने स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांच्या सूचनेवरून या रस्त्यावर नवीन पूल उभारणी करताना मातीचा भराव न टाकता तेथे सिमेंटचे खांब उभारून त्यावर पुलाचा पृष्ठभाग बांधायचा निर्णय घेतला. पुलाखाली खांब आल्याने पुलाखाली मोकळी जागा उपलब्ध होईल. त्यामधून पादचारी राजाजी रस्ता ते केळकर, टंडन रस्ता ये-जा करू शकतील. त्यासाठी पादचाऱ्यांना पूर्वीसारखे पुलावर जाण्याची गरज उरणार नाही. या पुलाच्या साठे शाळेकडील बाजूला एक सेवा रस्ता (सव्‍‌र्हिस रोड) तयार करून तो केळकर रस्त्याला जोडण्यात येणार आहे.

यामुळे पादचाऱ्यांबरोबर साठे शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांना शाळेतून बाहेर पडताना राजाजी रस्ता, पुलाखालील केळकर रस्ता ये-जा करण्यासाठी उपलब्ध होणार आहे, असे नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले. पुलाची नव्यानेच उभारणी होणार असल्याने या नव्या आराखडय़ाने पुलाची उभारणी करावी, अशी मागणी आपण प्रशासनाकडे केली होती. यासाठी दोन कोटी १९ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. आयुक्तांना त्यांच्या अधिकारात फक्त १० टक्के खर्च वाढीला मंजुरी देण्याचे अधिकार आहेत. खर्च मंजुरीचे अधिकार महासभेला असल्याने त्यास मंजुरी दिली तर राजाजी रस्त्यावर पुलाखाली यापूर्वी जी रिक्षा, पादचारी, शाळकरी विद्यार्थी, फेरीवाले अशी कोंडी व्हायची तो प्रश्न या नव्या रचनेत कायमचा सुटेल, असे आपण प्रशासनाला कळविले होते.  महासभेने  आराखडय़ाला मंजुरी दिली, असे नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले. नव्या रचनेत रेल्वे रुळाची पूर्व बाजू ते साठे विद्यालयादरम्यान (इंग्रजी ‘एस’ आकाराचा जुना वळण रस्ता) पुलाखाली सिमेंटचे खांब असणार आहेत. जुन्या रचनेत राजाजी रस्त्यावर फक्त मध्यभागी एक सिमेंटचा खांब आणि त्यावर पूल उभा होता. या पुलाच्या दोन्ही बाजूला पादचाऱ्यांना चढण्यासाठी शिडय़ा ठेवल्या होत्या. त्यामुळे या पुलाखाली नेहमी कोंडी होत होती.

कोपर पुलाचे रेल्वे मार्गावरील काम बहुतांशी पूर्ण होत आले आहे. राजाजी रस्त्यावरील पूल उभारणीचे काम तांत्रिक अडथळे आणि वाढीव खर्चाच्या कामामुळे रखडले होते. या वाढीव खर्चाच्या कामाला महासभेने मंजुरी दिली. मागील काही दिवसांपासून राजाजी रस्त्यावरील रखडलेले पुलाचे काम नवीन आराखडय़ाप्रमाणे या आठवडय़ापासून सुरू होईल.

-मंदार हळबे, स्थानिक नगरसेवक