स्मशानभूमीपाठोपाठ कारागृह स्थलांतरावरून नेतेमंडळी आमनेसामने

मानपाडा येथे भरवस्तीत स्मशानभूमी उभारण्याच्या मुद्दय़ावरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेत दोन गट पडले असतानाच आता ठाण्यातील मध्यवर्ती कारागृह घोडबंदर भागात हलवण्यावरूनही पक्षातील मतभेद समोर येत आहेत. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख व महापालिकेतील नरेश म्हस्के यांनी काही दिवसांपूर्वीच कारागृहाच्या स्थलांतरासाठी प्रस्तावाची सूचना मांडली होती. मात्र, ओवळा-माजिवाडा मतदारसंघातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी याला तीव्र विरोध करत हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.

ठाणे महापालिकेच्या यंदाच्या आर्थिक वर्षांतील अर्थसंकल्पास नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधरण सभेत अंतिम मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी देत असताना नगरसेवकांनी काही प्रस्तावाच्या सूचना मांडून त्यास निधीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यामध्ये ठाणे मध्यवर्ती कारागृह घोडबंदर भागात हलविण्याच्या प्रस्तावाची सूचना मांडून त्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी ही सूचना मांडली होती. ती सत्ताधारी नगरसेवकांनी मंजूर करून घेतली. त्यामुळे आता मध्यवर्ती कारागृह शहराबाहेर नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कारागृहाच्या विद्यमान जागेवर ‘टाऊन सेंटर’ उभारून त्याठिकाणी नागरिकांच्या विरंगुळय़ासाठी विविध सुविधा उभारण्यात येणार आहेत. मात्र, असे  असतानाच या प्रस्तावाच्या सुचनेस शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोध केला आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृह घोडबंदर परिसरात हलविल्यास येथील विकास कामांना खीळ बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ठाणे कारागृहापासून जास्तीत जास्त १५०० मीटर व कमीतकमी ५०० मीटर अंतरापर्यंत बांधकामांना परवानगी देता येत नाही. या कारणास्तव राबोडी परिसराची समूह पुनर्विकास योजना बारगळत असेल तर त्यासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृह घोडबंदर परिसरात हलविण्याचा घाट घालणे योग्य नसल्याचेही आमदार सरनाईक यांनी म्हटले आहे. त्यामुळे या भागातील विकासकामांना खीळ  बसेल, असे त्यांनी नमूद केले आहे. घोडबंदर परिसराच्या विकासाला बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर घोडबंदरवासीय अशा लोकप्रतिनिधींना नक्कीच धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मस्के आणि सरनाईक या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी मानपाडा येथील स्मशानभूमीच्या मुद्दय़ावरूनही मतभेद झाले होते व या दोघांनीही एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका केली होती.

ठाणे मध्यवर्ती कारागृह घोडबंदर भागात हलविण्यासंदर्भात ज्या नगरसेवकांनी प्रस्तावाची सूचना मांडली, त्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील मनोरुग्णालयाच्या मोकळ्या जागेत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कारागृह स्थलांतरित कराव

प्रताप सरनाईक, ,शिवसेना आमदार

कारागृहाला ऐतिहासिक पाश्र्वभूमी असल्यामुळे ते पर्यटनस्थळ व्हावे या उद्देशातून पक्षाच्या आदेशाने या प्रस्तावाची सूचना मांडण्यात आली होती. या सूचनेमध्ये घोडबंदरचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे विरोध करणाऱ्यांनी आधी प्रस्तावाची सूचना तपासून पाहावी

नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख