कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या काळात एकमेकांवर शरसंधान साधणाऱ्या शिवसेना तसेच भाजप या दोन्ही पक्षांनी अखेर युती केल्याने बुधवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत महापौरपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर तर उपमहापौरपदी भाजपचे विक्रम तरे यांची बिनविरोध निवड झाली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आठ दिवसांपूर्वी जाहीर झाला. त्यामध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. तसेच निकालानुसार शिवसेना एक क्रमांकाचा पक्ष तर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सुरुवातीला सत्ता स्थापन करण्यासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न सुरू केले होते. अखेर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपने युती केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
शेवटपर्यंत रंगत
महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांनी महापौरपदासाठी तर उपमहापौरपदासाठी राजेश मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरले. भाजपतर्फे महापौरपदासाठी राहुल दामले तर उपमहापौरपदासाठी विक्रम तरे आणि विशाल पावशे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते.
उमेदवारी अर्ज भरल्याच्या दिवशी संध्याकाळी मुंबईमध्ये दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी कल्याण-डोंबिवली पालिकेतील सत्तेसाठी युतीची घोषणा केली. त्यामुळे महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुका बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दुपारी पालिकेच्या सभागृहात महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.
भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल दामले, उपमहापौरपदाचे भाजपचे उमेदवार विशाल पावशे, शिवसेनेचे राजेश मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे महापौरपदासाठी देवळेकर, उपमहापौरपदासाठी तरे यांचेच अर्ज वैध ठरले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवळेकर यांचे अभिनंदन केले.
(छाया : दीपक जोशी)