महापौरांविरोधात फलकबाजी; वाहनखरेदी, लसीकरणावरून लक्ष्य

ठाणे : ठाणे महापालिकेतील जाहिरात ठेक्यांमधील कथित घोटाळा आणि नियम डावलून झालेल्या लसीकरणाच्या आरोपावरून महापौर नरेश म्हस्के यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत असलेल्या भाजपने शुक्रवारी शहरभर फलकबाजी करून हा मुद्दा आणखी तापवला. महापौर, सत्ताधारी शिवसेना यांच्यावर टीका करणारे हे फलक शहरात चर्चेचा विषय ठरू लागताच दुपारी पालिका प्रशासनाने ते हटवले. त्यावर ‘हा सत्तेचा गैरवापर’ असल्याची टीका भाजपने केली.

ठाणे महापालिकेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्याने भाजपने आक्रमकपणे शिवसेनेवर प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेमार्फत दिल्या गेलेल्या जाहिरात ठेक्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपने महापौरांवर निशाणा साधला. त्यानंतर करोनाकाळात नव्या गाड्यांच्या खरेदीसाठी आग्रह धरत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोधकांना आयता मुद्दा दिला. यावरून भाजपने महापौर, स्थायी समिती सभापतींसह सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. ही प्रकरणे ताजी असतानाच, महापौर म्हस्के आणि शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी कोविड लस घेतल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले.

भाजपने शुक्रवारी शहरभर फलक लावून पुन्हा एकदा महापौरांना लक्ष्य केले. शहरातील हे फलक दिवसभर चर्चेचा विषय ठरले होते. करोना योद्धे ठाण्याचा अभिमान… त्यांना सर्वप्रथम लस मिळणे, हा त्यांचा अधिकार… सेना आमदार, महापौरांनी लायनीत घुसून त्याचा केलाय अपमान…, शिवसेना-राष्ट्रवादी भाऊ भाऊ दोघे मिळून जनतेच्या पैशावर मजा करू, आर्थिक तंगीच्या नावावर विकासकामांना चाट… सत्ताधाऱ्यांची गाडी मात्र सुसाट, ठाण्यात कोविड केसची होतेय वाढ मात्र ठाणे महापालिका पुरवतेय महापौरांचे लाड… अशा आशयाचे फलक भाजप गटनेते मनोहर डुम्बरे यांनी शहरभर लावले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास प्रशासनाने हे फलक उतरविले. सत्तेचा गैरवापर करत फलक उतरविण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

‘पडून राहिलेल्या लशीचे बघा!’

‘ठाण्यात सध्या सुरू असलेला प्रकार पाहता निवडणुका जवळ आल्याची लक्षणे आहेत. एका लसचा इतका विचार करण्यापेक्षा सीरम संस्थेकडे सहा कोटी लशीचे डोस पडून आहेत. त्याची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येणार असून ही लस नागरिकांना देण्यासाठी केंद्र सरकार निर्णय का घेत नाही आणि त्यासाठी भाजपचे हे नेते का पाठपुरावा करीत नाहीत,’ असा सवाल महापौर नरेश म्हस्के यांनी केला. ‘करोना लसीकरणासंबंधी केंद्र सरकारने काढलेल्या पत्रात सहयोगी सेवकांना लस द्यावी म्हटले असून आम्ही करोनाकाळात सहयोगी सेवक म्हणूनच काम केले आहे,’ असे सांगत त्यांनी स्वत:च्या लसीकरणाचे समर्थनही केले.