ठाण्यामधील राबोडीमध्ये एका धोकादायक इमारतीला स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू झालाय. रविवारी सकाळी (१२ सप्टेंबर २०२१ रोजी) राबोडीमधील खत्री अपार्टमेंट या धोकादायक इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील तसेच पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने तीन रहिवाशी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये एका १४ वर्षीय मुलाचा समावेश असून त्याचीच प्रकृती चिंताजनक असल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ७५ जणांना सुखरुप ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ज्या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली तिच्या तीन विंग असून तिन्ही इमारती धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनी महानगरपालिकेने त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं अशी मागणी केलीय. सध्या या ७५ जणांना तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

ठाण्यात साडेचार हजार धोकादायक इमारती

ठाणे, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा या भागांत मोठय़ा प्रमाणात बेकायदा इमारती आहेत. अशा इमारती पावसाळ्यात कोसळून त्यामध्ये जीवितहानी झाल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. तसेच नौपाडय़ातील जुन्या अधिकृत इमारतीही मोडकळीस आल्या आहेत. अशा इमारतीही कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी तयार करते. त्यामध्ये धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ए , सी२बी आणि सी३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण करण्यात येते. यंदाही महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार केली होती.  पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने यंदाही मे महिन्यामध्ये शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये शहरात एकूण साडेचार हजार धोकादायक इमारती असल्याची माहिती समोर आलेली. त्यातील ७३ अतिधोकादायक इमारती असून गेल्या वर्षी अशा इमारतींची संख्या १०३ होती. नौपाडा-कोपरी परिसरात सर्वाधिक अतिधोकादायक इमारती आहेत, तर वर्तकनगर आणि वागळे इस्टेट भागात एकही इमारत धोकादायक नसल्याचे समोर आले होते. या यादीनुसार शहरात ४ हजार ५२२ इमारती धोकादायक असल्याची बाब पुढे आली आहे. गेल्या वर्षी शहरात ४ हजार ५०७ धोकादायक इमारती होत्या. त्यामुळे यंदा धोकादायक इमारतींच्या संख्येत १५ ने वाढ झाल्याचे दिसून आलं होतं.

शहरातील ४ हजार ५२२ पैकी ७३ इमारती धोकादायक असून येथील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्या आहेत. काही वर्षांपूर्वी कळवा परिसर अतिधोकादायक इमारतींच्या यादीमध्ये सर्वात आघाडीवर होता. मात्र यंदा त्या ठिकाणी एकही धोकादायक इमारत नसल्याचे यादीतून दिसून येते. तर शहराच्या मध्यवर्ती भागातील नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच ४३ धोकादायक इमारती आहेत. नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदरमध्ये केवळ एक इमारत धोकादायक आहे, तर वर्तकनगर भागात एकही इमारत धोकादायक नाही. सर्वात दाटीवाटीचा परिसर आणि अनधिकृत इमारती असलेल्या लोकमान्य-सावरकरमध्ये सात, उथळसरमध्ये सहा, कळव्यामध्ये पाच, मुंब्य्रामध्ये सहा आणि दिव्यामध्ये पाच इमारती अतिधोकादायक आहेत. असे असले तरी मुंब्रा, वागळे इस्टेट आणि दिवा भागांत धोकादायक इमारतींची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून आलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी

धोकादायक इमारती

प्रभाग समिती         इमारती

नौपाडा-कोपरी          ४५३

उथळसर              १३४

वागळे इस्टेट          १०८६

लोकमान्य-सावरकर      २१७

वर्तकनगर             ५४

माजिवाडा-मानपाडा       १२५

कळवा               १९३

मुंब्रा                 १४१९

दिवा                ८४१

एकूण                ४५२२