ठाण्यातील कापूरबावडी उड्डाणपुलावरील मुंबई दिशेची मार्गिका सोमवारी सायंकाळी खुली करण्यात आली खरी मात्र या शुभारंभ कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला भला मोठा मंडप उतरविण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे मार्गिका खुली होऊन २४ तास उलटूनही त्यावरून प्रवास करणे वाहनचालकांना शक्य झाले नाही. विशेष म्हणजे, मार्गिका सुरू नसल्याची कोणतीही सूचना प्रवेशालगत देण्यात आली नव्हती. त्यामुळे मार्गिकेपर्यंत पोहचून परत फिरण्याचा मनस्ताप वाहनचालकांना सोसावा लागत होता.
कापूरबावडी तसेच माजिवाडा जंक्शनवरील वाहतूक कोंडी भेदण्यासाठी या भागात उड्डाणपूल उभारण्यात आला. या पुलावरील मुंबई ते घोडबंदर, भिवंडी बायपास ते नाशिक, जुना भिवंडी रोड ते मुंबई आणि मुंबई ते भिवंडी रोड या मार्गिका सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, घोडबंदर ते मुंबई ही १८१३ मीटर लांबीची मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यापूर्वीच नादुरुस्त झाल्याने तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी या मार्गिकेचे काम पूर्ण होऊनही ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागल्याने अखेर सोमवारी या मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले आणि ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
मात्र, शुभारंभासाठी उभारण्यात आलेला मंडप हटविण्याचे काम संथगतीने सुरू असल्याने २४ तास उलटूनही मार्गिका बंदच होती.
मुंबई दिशेची मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याचे वृत्त पाहून घोडबंदरहून मुंबईला जाणाऱ्या अनेकांनी या मार्गिकेवरून मंगळवारी सकाळी प्रवास सुरू केला.
या मार्गिकेमुळे वाहतूक कोंडीमुक्त प्रवास होईल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र, ती प्रत्यक्षात फोल ठरली. उद्घाटनासाठी उभारण्यात आलेल्या मंडप काढण्याचे काम सुरू असल्याने ही मार्गिका मंगळवारी सकाळी बंद ठेवण्यात आली होती.
त्यामुळे उड्डाणपुलावरून या मार्गिकेच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी हा प्रवास अडचणीचा ठरला.
या मार्गिकेजवळून पुन्हा माघारी परतण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे या नागरिकांना खारेगाव टोल नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचा वापर करावा लागला.

२० किमीची वेगमर्यादा
कापूरबावडी उड्डाणपुलावरील मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गिकेमुळे वेगवान आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवास होण्याची शक्यता धुसर आहे. कारण प्रत्यक्षात पुलाच्या आखडय़ानुसार या मार्गिकेवर २० किलोमीटर इतकी वेगमर्यादा वाहनांना आखून देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गिकेवरून प्रवास करताना वाहनचालकांना वेगमर्यादेने वाहन चालवावे लागणार आहे. ही मार्गिका अतिशय वळणदार असल्याने त्यावर भरधाव वाहन चालविल्यास अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे र्निबध लागू करण्यात आले आहेत. ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा देत २० किमीची वेगमर्यादा पाळून अपघातमुक्त प्रवास करण्याचे आवाहन त्यांनी केले.