24 January 2019

News Flash

ठाणेकरांची धुरक्यामुळे घुसमट

ठाणे आणि नवी मुंबईतही हवेची गुणवत्ता ढासळली आहे.

प्रमुख चौकांतील प्रदूषणाचे प्रमाण १०० टक्क्यांपेक्षा अधिक 

थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असताना सकाळी वाढणारे बाष्प आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांमध्ये हवेतील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. आधीच प्रदूषित असलेल्या ठाण्यातील मुख्य वाहतूक चौकांमधील वायप्रदूषणाने बुधवारी धोक्याची पातळी गाठली. तीन हात नाका, नितीन कंपनी या शहरातील प्रमुख चौकांतील प्रदूषणाचे प्रमाण १०० टक्क्यांपेक्षा अधिक  नोंदविले गेले. मुंबई, नवी मुंबईतील हवेचा गुणवत्ता दर्जाही चिंताजनक पातळीपर्यंत ढासळला.

गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असतानाच बुधवारी सकाळपासून मुंबई महानगर प्रदेशात सकाळपासून धुरके पसरले होते. ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅन्ड रिसर्च’ने (सफर) मुंबईतील सर्वसाधारण हवा गुणवत्ता निर्देशांक २७५ म्हणजे ‘वाईट’ या स्तरापर्यंत नोंदविला. यंदाच्या दिवाळीनंतर प्रथमच मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची प्रत मोठय़ा प्रमाणावर ढासळल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही हवेची गुणवत्ता ढासळली आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबई महानगर प्रदेशातील वातावरणातील उष्मा वाढला असला तरी रात्री पारा खाली उतरत असल्याने या चढउताराचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वातावरणातील आद्र्रतेमुळे धुके पडते. धुक्यामुळे हवेतील प्रदूषित कण जमिनीलगतच अडकून राहतात. यावेळी वाऱ्याचा वेगही कमी असल्यास समस्या अधिक गंभीर रूप धारण करते आणि त्यामुळे हवेची प्रत ढासळते. मुंबईतील सकाळच्या तापमानात वाढ होत असली तरी त्यामध्ये बाष्पाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ढासळतो आहे. ‘सफर’ने मंगळवारी मुंबईतील सर्वसाधारण हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक २७१ नोंदविला होता. मात्र बुधवारी हा निर्देशांक वाढल्याची नोंद ‘सफर’ने केली. बुधवारी सकाळी हवेचा निर्देशांक २७५ नोंदविण्यात आला. संध्याकाळी हा निर्देशांक २७३ पर्यंत घसरल्याची नोंदही ‘सफर’ने केली. ‘पश्चिम भागात काही ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वातावरणात बाष्पाचे प्रमाण वाढले वाढून धुके मोठय़ा प्रमाणावर तयार होत आहे. रात्रीचे तापमान कमी होत असल्याने सकाळी धुके साचून राहते. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळत आहे. ही स्थिती दोन दिवसांत नियंत्रणात येणार आहे,’ अशी माहिती सफरचे संचालक डॉ. गुफरान बेग यांनी दिली.

वायुप्रदूषणात मोठी वाढ

ठाण्यात सर्वत्र बुधवारी ढगाळ वातावरण होते. वाहनांचा धूर आणि ढगाळ वातावरण यामुळे शहरात सर्वत्र धुरके पसरल्यासारखे दिसत होते. दुपापर्यंत शहरात असेच वातावरणात बदल होत होते. या बदलत्या वातावरणामुळे शहरातील वायुप्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे महापालिकेच्या दैनंदिन तपासणीतून समोर आले आहे. ठाणे महापालिकेने शहरातील तीन हात नाका, कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती कार्यालय परिसरात रहिवासी क्षेत्रासाठी तर रेप्टाकोस कंपनी परिसरात औद्योगिक क्षेत्रासाठी हवा गुणवत्ता तपासणी यंत्र बसविले आहे. त्याद्वारे शहरातील हवेच्या गुणवत्तेची दररोज तपासणी करून नोंद घेतली जाते.

First Published on February 8, 2018 2:15 am

Web Title: smog issue in thane air pollution