‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागातर्फे परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनींच्या हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकांमध्ये पेपर तपासनीसांनी खाडाखोड केल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या विषयाची तक्रार केली तर आपल्याला विद्यापीठात शिक्षण घेताना पुढे अडचण येईल म्हणून उघडपणे कोणीही विद्यार्थिनी बोलण्यास तयार नाही. उल्हासनगरच्या एका विद्यार्थिनीने मात्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना हा प्रकार कळवला असून प्रसंगी पेपर तपासनीसांच्या संशयास्पद भूमिकेविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
उत्तरपत्रिका उत्तमरीत्या सोडवल्या आहेत. चांगले गुण मिळवण्याची आशा होती, असे विद्यार्थिनींनी सांगितले. असे असताना गुण पाहिल्यानंतर हे गुण आपले नाहीतच, चुकीच्या पद्धतीने आपल्या उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या आहेत, असे विद्यार्थिनीचे मत झाले आहे. या काही विद्यार्थिनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी दूरध्वनीवर, प्रत्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेथे त्यांना कोणीही कर्मचारी दाद देत नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात खूप अंदाधुंद कारभार असल्याची चर्चा विद्यापीठात सुरू असल्याचे काही विद्यार्थिनींनी सांगितले.
उल्हासनगरमधील ज्योती पाटील या प्राध्यापिकेने ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागातर्फे हिंदी विषयासाठी प्रवेश घेतला होता. त्यांनी नोव्हेंबरमध्ये प्रथम वर्ष एम. ए.ची हिंदी विषयाची परीक्षा दिली. निकालानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आले. समाधानकारक गुण मिळतील याची खात्री असल्याने प्रा. ज्योती पाटील यांनी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना तेथे सुरुवातीचे काही दिवस उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. उत्तरपत्रिकांची प्रत देताना तुम्ही पुनर्गुणांकन करून बघा, प्रत मागू नका. फक्त एक ते दोन गुण वाढतील, असे परीक्षा विभागातून सांगण्यात आले.
पाटील यांनी पाठपुरावा करून आपल्या उत्तरपत्रिका परीक्षा विभागातून मिळवल्या. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. उत्तरपत्रिकांच्या मूळ गुणांच्या ठिकाणी सफेदी लावून गुणांमध्ये बदल केला असल्याचे आढळले. ज्या उत्तराला ६ ते ८ गुण वाढले असते तेथे हेतुपुरस्सर कमी गुण देण्यात आले आहेत, असे पाटील यांनी खासगीतून पुनर्गुणांकन करून घेतल्यावर लक्षात आले.
गेले काही दिवस महाविद्यालयातील नोकरी सांभाळून प्रा. पाटील विद्यापीठात या गैरप्रकाराविषयी फेऱ्या मारून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांना तेथे विद्यापीठ प्रशासन कोणतीही दाद देत नाहीत. या प्रकरणी कुलगुरूंकडे तक्रार केली आहे. त्याचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रा. ज्योती पाटील यांनी सांगितले. अनेक विद्यार्थिनी बढतीसाठी, शिक्षकी सेवेत येण्यासाठी या परीक्षा देत आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारे विद्यापीठाकडून अन्याय केला जात असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.
यासंदर्भात विद्यापीठाची बाजू समजून घेण्यासाठी दूरध्वनीवर सतत संपर्क करूनही कोणीही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाही. असाच अनुभव आम्ही घेत असल्याचे तक्रारदार विद्यार्थिनींनी सांगितले.

आमच्यावर झालेल्या अन्यायाची विद्यापीठाने दखल घ्यावी, अन्यथा याप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करून न्यायालयात दाद मागण्याचा आमचा विचार आहे.
   – ज्योती पाटील, विद्यार्थिनी