लोकल ट्रेनमध्ये जागा अडवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम; ११७ प्रवाशांवर कारवाई

रेल्वे लोकल ट्रेनमध्ये जागा अडवणाऱ्यांविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई सुरू केली आहे. यासाठी बोरिवली ते विरारदरम्यान चार विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या मोहिमेत आतापर्यंत ११७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी खास व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही तयार करण्यात आला आहे.

वसई-विरार तसेच पालघरमधून दररोज लाखो प्रवासी मुंबईत कामानिमित्त लोकल ट्रेनने प्रवास करीत असतात. मात्र या प्रवाशांना लोकलमाफियांचा त्रास सहन करावा लागतो. दारात उभे राहून इतर प्रवाशांचा मार्ग अडवणे, लोकल डब्यातील सीट अडवणे, विरार ट्रेन असेल तर बोरिवलीच्या प्रवाशांना उतरू न देणे असे प्रकार ते करीत असतात. या लोकलमाफियांच्या दादागिरीचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे हाणामारीचे प्रसंगही ओढवले आहेत.

लोकलमाफियांच्या या दादागिरीचा सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याच्या अनेक तक्रारी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाकडे आलेल्या होत्या. त्यामुळे जागा अडवणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने विशेष मोहीम सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम जोरात सुरू झाली असून आतापर्यंत ११७ प्रवाशांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली, असे विरार रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीसप्रमुख डी. एन. मल्ल यांनी सांगितले.

रेल्वे सुरक्षा बलाच्या या मोहिमेमुळे सर्वसामान्य प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे, तर लोकल ट्रेनच्या दारात उभे राहून दादागिरी करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला आहे.

लोकलमधील दादागिरीच्या घटना

* २८ जून २०१६

विरार येथे राहणारी ऋतुजा नाईक या तरुणीने वसईला उतरण्यासाठी चर्चगेट लोकल पकडली; परंतु तिला उतरू देण्यात आले नव्हते. वसई रेल्वे पोलिसांनी चार महिलांना अटक केली.

* २० ऑक्टोबर २०१६

डहाणू लोकलमध्ये चढलेल्या विरारच्या एका प्रवाशाला पालघरच्या प्रवाशांनी विरार स्थानकात उतरू दिले नव्हते. त्याच्या तक्रारीवरून रेल्वे सुरक्षा बलाने पालघरच्या १४ प्रवाशांना विरार स्थानकातून अटक केली.

* ८ नोव्हेंबर २०१७

डहाणू-चर्चगेट लोकलमध्ये चढण्यासाठी विरार स्थानकात महिला प्रवासी सज्ज झाल्या. मात्र आतील महिलांनी डब्याचे दरवाजे बंद केले. त्यामुळे सहा मिनिटे रेल्वे वाहतूक खोळंबली.

* १९ नोव्हेंबर २०१७

नालासोपारा येथे राहणाऱ्या प्रभा देवा या महिलेला चर्चगेट लोकलमध्ये महिलांनी मारहाण करून हाताचा चावा घेतला. दारात उभे राहण्यावरून वाद झाला. वसई रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांना अटक केली.

* सप्टेंबर २०१७

नालासोपारा येथे राहणारी सपना मिश्रा ही तरुणी वांद्रे-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये चढली आणि रिकाम्या जागेवर बसली. मात्र तीन महिलांनी ही आमची जागा आहे, असे सांगून तिला मारहाण केली.

* १७ ऑक्टोबर २०१७

पवन तिवारी या प्रवाशाला विरारा स्थानकात उतरू दिले नाही. त्यामुळे त्याला सफाळेपर्यंत जावे लागले. त्याच्या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी १७ जणांना अटक केली.

काय करणार?

विरार ते बोरिवलीदरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या ४ तुकडय़ा तैनात केल्या आहेत. रेल्वे प्रवाशांच्या गर्दीनुसार सकाळी ६ ते १० व संध्याकाळी ६ ते १० या वेळेत हे पथक काम करणार आहे. या कारवाईला परिणामकारक स्वरूप देण्यासाठी खास व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. दादागिरी करणाऱ्या आणि जागा अडवणाऱ्या प्रवाशांची चित्रफीत बनवून या ग्रुपवर टाकण्यात येते आणि त्यानुसार लगेच कारवाई करण्यात येते.

दादागिरी करणाऱ्यांविरोधात रेल्वे पोलीसही नियमित कारवाई करीत असतात. कुणी जागा अडवत असेल, ट्रेनमध्ये शिरू देत नसेल तर त्यांच्याविरोधात प्रवाशांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात.

-विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे</p>

रेल्वे सुरक्षा बलाने सुरू केलेली मोहीम प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सर्वानाच लोकलमधून प्रवास करण्याचा अधिकार असून कोणीही कोणाला अडवू शकत नाही.

– महेश पाटील, डहाणू-वैतरणा रेल्वे प्रवासी सेवाभावी संस्था