कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावरून वाहन चालवताना दर पाच ते दहा मिनिटांनी गाडी गतिरोधकावरून उडू लागली आहे. कोणत्याही शहरात गतिरोधकांचे प्रमाण किती असावे, याविषयी काही नियम आखून देण्यात आले आहेत. असे असताना वाहनांच्या वेगाला आवर बसावा यासाठी कल्याण-डोंबिवलीत महापालिकेने जागोजागी गतिरोधक बसविल्याने वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. या गतिरोधकांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून इंधनाचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत.
उच्च न्यायालयाने एका आदेशाने रस्त्यावरील गतिरोधक हटवण्याचे आदेश दिले आहेत. गतिरोधक बांधायचे असतील तर सार्वजनिक बांधकाम विभागाला परिमाण निश्चित करून दिले आहेत. या परिमाणानुसार गतिरोधक बसविले जावेत, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. ठाणे शहरात मध्यंतरी बसविण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे वाहनांना हादरे बसत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यानंतर काही ठिकाणी फायबरचे गतिरोधक काढण्यात आले.
कल्याण-डोंबिवलीत अलीकडे गतिरोधक बांधताना बांधकाम विभागाचे कोणतेही परिमाण वापरले जात नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  दुचाकीस्वारांना असे गतिरोधक ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, नगरसेवकांचे बंगले, घरांसमोर गतिरोधक नियमबाह्य़ापणे बांधण्यात आल्याचे दिसते.