महापालिकेकडून नागरिकांना महत्त्वाच्या सूचना

ठाणे : ठाणे शहरात बुधवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसानंतर रस्ते, गृहसंकुल आणि बैठय़ा चाळींमध्ये साचलेले पाणी ओसरून जनजीवन पूर्वपदावर येत असताना गुरुवारी दुपारी शहरात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तासाभराने पावसाने विश्रांती घेतली असली तरी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमी वर पालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नका तसेच विजेचा खांब आणि रस्त्यावरील झाडे यापासून दूर राहा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

ठाणे शहरात गुरुवार दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. तासाभरातच पाऊस थांबल्यामुळे शहरात पाणी साचल्याच्या घटना घडल्या नाहीत. पावसानंतर तीन हात नाका उड्डाणपुलावर लावण्यात आलेला बॅनर निघून तो रस्त्यावर लटकत होता. अपघाताची शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने तो काढून टाकला. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शहरात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक तैनात करण्यात आले असून त्यामध्ये तीन अधिकारी आणि १७ जवानांचा समावेश आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमी     वर सतर्क राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, पाऊस सुरू असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे, विजा चमकत असल्यास विजेचे खांब किंवा झाडाखाली उभे राहू नये तसेच आपली वाहने रस्त्यावर झाडाखाली उभी न करता सुरक्षित ठिकाणी उभी करावीत, मोबाइलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नागरिकांशी संवाद साधून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन

ठाणे शहरात बुधवारी दिवसभरात १२२ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सखल भाग, रस्ते, गृहसंकुले आणि बैठय़ा चाळीत पाणी शिरले होते. गुरुवार सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पावसाचे साचलेले पाणी ओसरले. नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्यामुळे पाणी साचल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमी     वर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांनी संयुक्तपणे शहराचा पाहणी दौरा केला. अतिवृष्टीमुळे शहरातील पाणी साचण्याऱ्या ठिकाणी पंप लावणे, रस्त्यावर वाहून आलेला कचरा तसेच पडलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे निर्देश आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित विभागास दिले. चिखलवाडी येथे मुसळधार पावसात नेहमीच पाणी साचत असल्याने त्या ठिकाणी पंप लावण्यात आले असून इतर अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महापौर आणि आयुक्तांनी तेथील नागरिकांशी संवाद साधून येथील समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पनामा येथील नाला रुंदीकरण करण्याची सूचना महापौरांनी केली.