डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील उघडय़ा स्कायवॉकवर छप्पर टाकण्याच्या कामास अखेर महापालिकेने सुरुवात केली आहे. गर्दीचा ओघ कमी असलेल्या डोंबिवली पश्चिमेकडील द्वारका हॉटेलकडील स्कायवॉकवर छप्पर टाकण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेचे उपअभियंता प्रशांत भुजबळ यांनी दिली.
पश्चिमेतील विष्णुनगर, पूर्व भागातील डॉ. रॉथ रस्ता, पाटकर रस्त्यावरील स्कायवॉकवर छप्पर टाकण्याची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. छप्पर टाकण्यासाठी लोखंडी पट्टय़ा, वेल्डिंगची कामे करावी लागतात. छप्परवरील पट्टय़ा टाकताना काही वेळा सुतारांना काम करावे लागते. प्रवाशांचा सततचा राबता सुरू असल्याने ही कामे करण्यात विलंब होत आहे. त्यामुळे कमी वर्दळीच्या पश्चिम भागातील स्कायवॉकवरील काम हाती घेण्यात आले आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. आकर्षक अशा फायबर पट्टय़ा छपरासाठी वापरण्यात येत आहेत. ऊन, वारा, पाऊस यापासून पादचाऱ्यांचे संरक्षण करण्याचे काम या छपरामुळे होईल. तसेच हवेतील धूळ उडून ती सतत स्कायवॉकवर पडत असते. हा प्रकार यापुढील काळात थांबणार आहेत. अगदी जिन्याची पहिली पायरी चढण्यापासून ते रेल्वे स्थानकात पोहोचेपर्यंत स्कायवॉकवर छत बसविण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे अशा स्वरूपाचे छप्पर बसविले जावे, अशी मागणी करण्यात येत होती.