News Flash

शाळेच्या बाकावरून : वाचनसंस्कृती वाढवण्याचा वसा

या सुप्रसिद्ध लेखकाप्रमाणे आपल्या संतमाहात्म्यांनीदेखील वाचनाचे महत्त्व विशद करताना ‘वाचाल तर वाचाल’ असेच सांगितले आहे.

| February 24, 2015 12:43 pm

tvlo02I t is what you read when you don’t have to, that determines what you will be when you can’t help it.- Oscar Wilde
या सुप्रसिद्ध लेखकाप्रमाणे आपल्या संतमाहात्म्यांनीदेखील वाचनाचे महत्त्व विशद करताना ‘वाचाल तर वाचाल’ असेच सांगितले आहे. माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांचे किती मोलाचे योगदान आहे हेच यावरून सिद्ध होते. गेल्या काही वर्षांत समाजातील वाचनाचे प्रमाण कमी होत असल्याने त्यावरून सातत्याने ऊहापोह होत असतो. समाजातील काही संस्था, मात्र यात न अडकता कृतिशील पावले उचलतात. वाचनसंस्कृती जतन आणि वृद्धिंगत करण्याचे व्यापक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या ‘ग्रंथाली’ वाचक चळवळीविषयी आपण सर्वजण जाणतोच. विविध क्षेत्रातील लोक ‘ग्रंथाली’शी जोडले गेले आणि संस्थेच्या कार्याने प्रेरित होऊन आपापल्या परीने योगदान देऊ लागले. ठाण्यातील अविनाश आणि नंदिनी बर्वे आणि श्रीधर गांगल हेदेखील ‘ग्रंथाली ’ ठाणे केंद्रातर्फे शालेय विद्यार्थ्यांवर वाचनसंस्कार करण्यासाठी तळमळीने कार्य करीत आहेत.
‘ग्रंथाली’च्या अनेकविध उपक्रमांपैकी असलेला वाचकदिनाचा उपक्रम ठाणे केंद्रातर्फे १९९८ पासून आयोजित केला जात आहे. नवीन पिढीला ग्रंथालीच्या कार्याचा परिचय व्हावा आणि ती जोडली जावी, त्यांच्याच वाचनाची आवड निर्माण व्हावी या व्यापक उद्देशाने गेली १७ वर्षे वाचकदिनाच्या कार्यक्रमाची आखणी केली जात आहे. दरवर्षी नावीन्यपूर्ण विषयास प्राधान्य देताना एक पुस्तक दोन पिढय़ा, तेथे कर माझे जुळती, मराठीचे पाठय़पुस्तक मुलांना कसे वाटते, लहान तरी महान गावे इ. विषय हाताळण्यात आले आहेत. वाचनाविषयी मुलांची मते जाणून घेण्यासाठीचा परिसंवाद, ठाण्यातील बालकवी हा प्रकल्प, शुद्धलेखन किंवा रूपांतर हे सूत्र ठेवून केलेले कार्यक्रम, कवितांसाठीची कार्यशाळा, म्हणींचिया खाणी, अनुभवांची गाणी इ. कार्यक्रम ही अत्यंत वैशिष्टय़पूर्ण होते. गेल्या महिन्यातच साजऱ्या झालेल्या वाचकदिनांचा विषय होता लढा स्वातंत्र्याचा. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे आणि ते मिळवून देणाऱ्या शूरवीरांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे हा विचार त्यामागे होता. आजपर्यंतच्या विषयांवर नजर टाकल्यास काही गोष्टी प्रकर्षांने जाणवतात. विषयांमधील वैविध्य, प्रगल्भता, सकस साहित्याशी मुले जोडली जावीत आणि त्यातून वाचनाची आवड निर्माण व्हावी ही बर्वे दाम्पत्य आणि गांगल या त्रिमूर्तीची आंतरिक तळमळ.
कागदावरील कल्पना प्रत्यक्षात यशस्वी होते, जेव्हा त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. साधारणपणे दिवाळीच्या सुटीच्या आधी कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारे पत्रक ठाण्यातील ३० ते ४० शाळांमधून वाटले जाते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांना तयारीसाठी पुरेसा अवधी मिळतो. श्री. बर्वेसर आणि गांगल हे प्रत्येक शाळेत तीनदा-एकदा पत्रक देण्यास, नंतर तयारी कुठपर्यंत आली ते पाहण्यासाठी आणि मग कार्यक्रम जवळ आला त्याची आठवण करण्यासाठी जातात. कष्टकरी समाजातील विद्यार्थी सहभागी व्हावेत म्हणून सावरकर नगर, रामचंद्र नगर, किसननगर इ. भागातील शाळांना आवर्जून भेट देतात. पण त्यांचे काम इथेच थांबत नाही तर विषयासंबंधित पुस्तकं उपलब्ध करून देणं, सादरीकरणाविषयी मार्गदर्शन करणं इ. सर्वतोपरी साहाय्य ही त्रिमूर्ती तत्परतेने करते. दरवर्षीचा कार्यक्रम नियोजनबद्ध रीतीने पार पडतो. मुलांमधील सर्जनशीलतेला वाव मिळवून देण्याचा हेतू त्यामागे आहे. त्यामुळे सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे कौतुक करताना एक पुस्तक आणि खाऊ दिला जातो. या कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे तेथील शिक्षक आणि कर्मचारी यांनादेखील एक पुस्तक (यावर छोटीशी कविता लिहून) दिले जाते. कर्मचारी म्हणजे अगदी सफाई कामगार, ध्वनी व्यवस्था पाहणारा, वडापाव देणारा आचारी कोणालाही वगळले जात नाही. कार्यक्रम झाल्यावर सहभागी शाळांनी सादर केलेल्या कार्यक्रमातील एका प्रसंगाचा फोटो आणि त्याला अनुरूप प्रतिक्रिया लिहून बर्वे सर आणि श्रीधर गांगल सगळ्या शाळांमध्ये नेऊन देतात. कार्यक्रमात सहभागी होण्यास उद्युक्त करण्यापासून सहभागी झाल्याबद्दल अशी अनोखी शाबासकी देण्यापर्यंतचे वर्तुळ पूर्ण होते. कोणताही कार्यक्रम आयोजित करणे हे एक आव्हान असते आणि आज सत्तरीच्या आसपासची ही त्रिमूर्ती ३०-४० शाळांमधून तीनदा स्वखर्चाने फिरणे, २ दिवसांच्या या कार्यक्रमासाठी एखादी शाळा मिळवणे, (कारण ३० ते ३५ शाळा x ५ ते ७ विद्यार्थी, शिक्षक, पालक यांची सोय करावी लागते), कार्यक्रमासाठी आवश्यक अशा महत्त्वपूर्ण बाबींची व्यवस्था (ध्वनिक्षेपक, ध्वनिव्यवस्था, खुच्र्या, किंतान इ.) आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमासाठी निधी जमा करणे इ. सर्व आघाडय़ा सांभाळण्यात बर्वे सरांचा सिंहाचा वाटा असतो.
हेमा आघारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 12:43 pm

Web Title: strategies for the development of a reading culture
टॅग : Reading
Next Stories
1 ठाणे.. काल, आज, उद्या : हिरवाई ते काँक्रिटचे जंगल
2 ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट
3 बीएसयूपी प्रकल्पाला घरघर!
Just Now!
X