अंबरनाथ, बदलापुरात निर्बिजीकरणाचे काम ठप्प; भीतीचे वातावरण

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापुरात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या भटक्या श्वानांची संख्या चिंताजनक बनली आहे.   गेल्या काही वर्षांत या श्वानांच्या निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्यात स्थानिक नगरपालिका अपयशी ठरल्या आहेत.

श्वानांकडून लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, चावा घेण्यासारखे प्रकाराने  नागरिकांमध्ये असलेल्या भीतीमध्ये  अधिक भर पडली आहे.

करोनाच्या संकटात गेल्या पाच महिन्यांपासून घरात कोंडलेले सर्वसामान्य नागरिक टाळेबंदीच्या शिथिलतेनंतर घराबाहेर पडू लागले आहेत.  उद्याने, बाजार तसेच नोकरी, कामानिमित्त ये-जा सुरू झाली आहे.   शाळांना सुट्टय़ा असल्याने गेल्या काही दिवसांत लहान मुलेही आई, वडील आणि आजी आजोबांसोबत घराबाहेर फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यात टाळेबंदीच्या काळात अंबरनाथ आणि बदलापूर शहरात भटक्या श्वानांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. अंबरनाथमध्ये सुमारे सात हजार तर बदलापूरमध्ये साडेचार भटके श्वान असल्याची माहिती मिळते.  रात्रीच्या वेळी आणि पहाटे  नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेकदा भटके श्वान नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याचे प्रकार होत आहेत. तर अनेक जणांना या भटक्या श्वानांनी चावा घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे विविध ठिकाणच्या या भटक्या श्वानांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अंबरनाथ शहरात भटक्या श्वानांच्या त्रासाला कंटाळून काही नागरिकांनी टोकाचे पाऊल उचलल्याचेही गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले होते. श्वानांना शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी काही नागरिकांवर अंबरनाथमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र या सर्व परिस्थितीत भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.   नगरपालिकांकडून निर्बिजीकरणाच्या मोहिमेकडे दुर्लक्ष झाले आहे.

दोन्ही नगरपालिकांने निमल वेल्फेअर या संस्थेला निर्बिजीकरणाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून त्यांना शस्त्रक्रिया केंद्र सुरू करून दिले नसल्याने भटक्या श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात अडचणी येत आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या या कार्यक्रमासाठी कार्यादेश जाहीर करूनही संस्थेने अनेक महिने कार्यादेश स्वीकारले नव्हते. त्यात करोनाच्या संकटात पालिका फक्त करोना नियंत्रणासाठी काम करत असल्याने इतर गोष्टींकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.

जागेचा प्रश्न

बदलापूर शहरात भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी  वेळेत जागा उपलब्ध झाली नसल्याचे निर्बिजीकरणाची मोहीम सुरू होऊ  शकली नसल्याची कबुली आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.