कचरा वेचकांच्या मुलांनी कचरा वेचक न बनता त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, त्यांनीही नोकरी, व्यवसाय करावा या उद्देशातून नवोदय चळवळ संस्थेतर्फे कल्याणमध्ये कचरा वेचकांच्या मुलांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात कचरा वेचकांची लहान-मोठी सुमारे २५० मुले-मुली सहभागी झाली होती. या कार्यक्रमाला बिशप थॉमस मार्कितोस, फादर मॅथ्यू फिलीप उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल मॅथ्यू फिलीप यांनी सांगितले, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, साठेनगर येथील कचराक्षेपण भूमीवर कचरा वेचून उपजिविका करणारी अनेक कुटुंबे आहेत. या कुटुंबातील मुले शाळेत न जाता आपल्या पालकांच्या मागे कचरा वेचण्यासाठी क्षेपणभूमीवर जातात. या चारही ठिकाणच्या क्षेपणभूमीवर कचरा वेचणाऱ्या पालकांशी संपर्क साधला. त्यांची मुले शाळेत आली पाहिजेत, असा आग्रह धरला. पालकांचे मनपरिवर्तन झाल्याने पालकांनी आपल्या मुलांना शाळेत घेऊन जाण्याची परवानगी दिली. नवोदय चळवळ या कचरा वेचक मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. या मुलांच्या देखभालीसाठी संस्थेने १५ शिक्षक, कर्मचारी नियुक्त केले आहेत.
काही मुले भिवंडी येथील पालिकेच्या शाळेत, काही कल्याणमधील नूतन विद्यालयात शाळेत आणली जातात. २५० मुले सध्या या चार ठिकाणच्या शाळांमध्ये जात आहेत. अनेक मुले त्वचा रोग, टीबीने आजारी आहेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.  कचरा वेचणे एवढेच या मुलांच्या पालकांचे त्यांचे असल्याने त्यांचे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष नाही. म्हणून नवोदय चळवळीने या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा उपक्रम सुरू केला आहे. या मुलांना आनंद मिळावा यासाठी स्नेहमेळाव्याचे  आयोजन केले होते. या मेळाव्यात या मुलांबरोबरच त्यांचे पालकही सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांमधील उत्साह
’स्नेहसंमेलनात या विद्यार्थ्यांच्यासमोर जादूगाराने जादूचे प्रयोग केले.
’विद्यार्थ्यांना गाणी म्हणण्यास सांगण्यात आले.
’रंगीबेरंगी झेंडे, फुले विद्यार्थ्यांना देऊन त्यांना
खूश करण्यात येत होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Street children enjoy at carnival
First published on: 23-07-2015 at 12:05 IST