विरारहून वसईला जाण्यासाठी चर्चगेट लोकल पकडल्याचे कारण; रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी होणे आता नित्याचेचे झाले आहे. पश्चिम रेल्वेवर तर क्षुल्लक कारणांमुळे प्रवासी एकमेकांशी वाद घालतात आणि त्याचे पर्यावसान हाणामारीत होते. एखाद्या प्रवाशाला एक-दोन स्थानके सोडून पुढे  जायचे असेल, तर त्याने दूरची गाडी पकडायची नाही, हा पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनी काढलेला अलिखित नियम. या नियमांचे पालन झाले नाही, तर अन्य प्रवासी भडकतात आणि मग त्या प्रवाशाला मारहाण करतात. बुधवारी वसईत हाच प्रकार घडला. विरारहून वसईला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीने चर्चगेट लोकल पकडली. मात्र तू चर्चगेट लोकलच का पकडली, असे दरडावत इतर महिला प्रवाशांनी या विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे रेल्वे लोकलमधील महिला प्रवाशांची दादागिरी हा विषय पुन्हा समोर आला आहे.

विरारमध्ये राहणारी ऋतुजा नाईक ही तरुणी वसईच्या वर्तक महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेते. वसईला सकाळी नऊ वाजता महाविद्यालय असल्याने ती ८ वाजून ४० मिनिटांची चर्चगेट लोकल पकडते. मंगळवारी तिने नेहमीप्रमाणे ही लोकल पकडली; परंतु तिच्याकडे असलेल्या अभियांत्रिकी साहित्यामुळे डब्यातील अन्य महिलांशी तिचा वाद झाला. ‘वसईला जायचे आहे मग चर्चगेट लोकल का पकडली, अंधेरी किंवा बोरिवली लोकल का पकडली नाही,’ असा जाब त्यांनी तिला विचारला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. धावत्या ट्रेनमध्ये तिला मारहाण सुरू होती.

ऋतुजाला दम्याचा त्रास असल्याने तिची अवस्था बिकट झाली. कशीबशी ती वसई रोड रेल्वे स्थानकात उतरली आणि तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. महिलांची डब्यात दादागिरी असते, त्या जागा अडवून ठेवतात, असे तिने सांगितले.

वसई रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात महिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी मुलीला आम्ही पुन्हा जबाब देण्यासाठी बोलावले असून तो झाल्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी सांगितले.ू

महिला प्रवाशांचे गट

सामान्य डब्यात पुरूष प्रवाशांचे गट असतात, तसे गट महिला प्रवाशांच्या डब्यात आहेत. या महिला बोरीवलीत चढणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांसाठी जागा ठेवतात. मात्र अन्य महिलांना बसू देत नाहीत, असे काही महिला प्रवाशांनी सांगितले. दादागिरी करणाऱ्या महिला प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.