करोनाच्या रुग्णांचा आकडा सातवर; लक्षणे आढळलेले १५ जण विलगीकरण कक्षात

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ामध्ये ‘करोना’चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा तसेच महापालिका आरोग्य यंत्रणांनी परदेशातून प्रवास करून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरामध्येच वेगळे राहण्याच्या (गृहअलगीकरण) सूचना दिल्या आहेत. विविध महापालिकांची आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत असून आतापर्यंत जिल्ह्यात २२ जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली असून त्यांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी सात जणांना करोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

ठाणे जिल्ह्यात आढळून आलेल्या करोना रुग्णांमध्ये कल्याण आणि नवी मुंबईतील प्रत्येकी तीन, तर ठाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. परदेशातून प्रवास करून आलेल्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली असून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अशा प्रवाशांसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्य़ात परदेशातून प्रवास करून आलेल्या तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरात राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्यापैकी २२ जणांचा १४ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य आणि महापालिका यंत्रणा सज्ज झाल्या असून त्यासाठी त्यांनी गर्दीची ठिकाणे र्निजतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे.

मास्कवाटपामुळे गर्दी

‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिक्षाचालकांना जिल्हा प्रशासनातर्फे ५०० मास्क देण्यात आले. राज्याचे नगरविकासमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी ठाणे स्थानकात रिक्षाचालकांना या मास्कचे वाटप करण्यात आले. मात्र, त्यावेळेस रिक्षाचालकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. या संदर्भात एकता रिक्षा टॅक्सी चालक-मालक सेनेचे अध्यक्ष विनायक सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता, दोन-दोन रिक्षाचालकांना बोलावून मास्कचे वाटप केले जात होते, असा दावा त्यांनी केला.

खासगी डॉक्टरांचे पथक सज्ज

ठाणे : करोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील १०० खासगी डॉक्टरांचे पथक सज्ज झाले आहे. ‘ठाणे रॅपिड अ‍ॅक्शन करोना टिम’ असे या पथकाचे नाव असून हे सर्व डॉक्टर ठाण्यातील विविध खासगी रुग्णालयांत कार्यरत आहेत. राज्य शासनाने आदेश दिल्यास त्वरित सरकारी डॉक्टरांना सहकार्य करण्यास सज्ज असेल, असे या पथकातील डॉ. दिनकर देसाई यांनी सांगितले.

करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासकीय आरोग्य यंत्रणांवर प्रचंड कामाचा ताण वाढला असून हा ताण कमी करण्यासाठी आता ठाण्यातील खासगी डॉक्टर पुढे सरसावले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि जनरक्षा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील १०० खासगी डॉक्टरांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात डॉक्टरांसह परिचारिकांचाही समावेश आहे.

परदेशातून आलेले प्रवासी

चीन १६, अमेरिका ५, फ्रान्स ३, दुबई ४२, इराण २१, सिंगापूर ४, इटली ५, थायलंड ३, जपान ३, भूतान ४, मस्कत २, सौदी ९, जर्मनी ५, बहरीन १, कोरिया २, इंडोनेशिया १, युनायटेड किंगडम ६, कतार १, मॉरिशस १, टर्की १, आर्यलड १, युनायटेड अरब एमिरेट्स ३, रोमानिया १ या परदेशी रुग्णांसह पुणे २, केरळ १, गोरखपूर ४ आणि इतर १३ असे एकूण १६१ प्रवाशांवर घरात वेगळे राहण्यास सूचना देण्यात आल्या आहेत.

शहरनिहाय परदेशी प्रवासी

* ठाणे                       ७७

* कल्याण                  ४

* नवी मुंबई               १४

* उल्हासनगर            १

* भिवंडी                     २

* मीरा-भाईंदर           ५३

* ग्रामीण                   १०

एकूण                        १६१

ठाणे जिल्ह्य़ात १६१ जणांना घरात वेगळे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आतापर्यंत सात जणांना करोनाची लागण झाली आहे. करोनचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

– डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक