‘जोश्यांचा लेकी-सुना’ कार्यक्रमात सुहास जोशी यांचे प्रतिपादन

नाटक करण्याकडेच माझा अधिक कल होता. मात्र चित्रपट, मालिकेत काम केल्याशिवाय प्रेक्षक नाटक बघायला येत नाहीत, असा माझा अनुभव आहे. त्यामुळेच मालिका आणि चित्रपटांचा पर्याय अनेकांना निवडावा लागतो. अर्थात एकदा सुरू झालेली मालिका केव्हा बंद होईल हे ब्रम्हदेव जरी खाली आला तरी सांगू शकणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी केले.

‘इंद्रधनु’ संस्थेतर्फे गुरुवारी संध्याकाळी सहयोग मंदिर येथे आयोजित केलेल्या ‘जोश्यांच्या लेकी-सुना’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सई परांजपे, अरुण जोगळेकर, विजया मेहता यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव आणि अभिनय प्रवासातील गमतीजमती जोशी यांनी गप्पांच्या ओघात सांगितल्या. अभिनेत्री पद्मश्री आणि पल्लवी जोशी या बहिणींनी बालपणीच्या आठवणी जागवल्या.

सध्या वेब सीरिजसाठी काही नवीन संकल्पना डोक्यात असून त्यावर काम सुरू असल्याचे पल्लवी यांनी सांगितले. सोनालिका जोशी यांनी ‘तारक मेहता’च्या सेटवर जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा लिखाण करते आणि चित्रकलेची आवड असल्यामुळे चित्रही काढत असल्याचे सांगितले.

‘दोन वाक्यांमधील अर्थही पोहोचवावा लागतो’

गायिका मृदुला दाढे-जोशी म्हणाल्या, आयुष्यात आलेल्या प्रत्येक गुरूंनी मला गाण्याची दृष्टी दिली. कवितेचे गाणे करताना कवीने लिहिलेल्या शब्दांना न्याय देण्याबरोबरच दोन वाक्यांमधील अर्थदेखील गाण्यातून समोरच्यापर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करत असते. त्यांनी या वेळी ‘मृदुलकरांनी छेडीत तारा’ ‘आणि तुम्हावरी केली मी मर्जी बहाल’ या गाण्यांची झलक सादर केली.